वस्तू आणि सेवाकर मंडळाने अखेर सॅनिटरी पॅड वस्तू आणि सेवाकरातून वगळले आहे. विविध स्त्रीसंघटनांकडून तसेच अनेक महिलांकडून सातत्याने सॅनिटरी पॅड जीएसटीमुक्त करण्याची मागणी होत होती. काहींनी तर याआधी सॅनिटरी पॅडवर संदेश लिहून ते जीएसटी मुक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केलं होतं. अखेर या मागणीला यश आलं असून सॅनिटरी पॅड जीएसटीमधून वगळण्यात आले आहेत. याआधी सॅनिटरी पॅडवर १२ टक्के कर होता. या निर्णयाचं पॅडमॅन अक्षय कुमारनं स्वागत केलं आहे.

‘वस्तू आणि सेवाकरातून सॅनिटरी पॅड वगळले ही बातमी ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता ती पूर्ण झाली. ही गरज तुम्ही ओळखली आणि त्यावर योग्य निर्णय घेतला यासाठी मी जीएसटी कौन्सिलचे आभार मानतो. आज देशभरातील महिला तुमचे मनापासून आभार मानत असतील’ असं ट्विट अक्षयनं केलं आहे. मासिक पाळीमध्ये महिलांच्या शारिरीक स्वच्छतेची जाणीव ठेवत अरुणाचलम मुरुगानंथम यांनी स्वस्त दरातील सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती केलेली. त्यांच्याच जीवनावर आधारित ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमारनं महत्त्वाची भूमिका साकारली.

या चित्रपटादरम्यान आणि नंतरही अक्षयनं पुढाकार घेऊन मासिक पाळीविषयी उघडपणे भाष्य केलं. या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सॅनिटरी पॅडवर कर लादण्यात आला त्यावेळीदेखील या निर्णयाचा अक्षयनं विरोध केला होता. सॅनिटरी पॅडच्या किंमतीमुळे आजही महिला ते वापरत नाही, त्यातून कर लावल्यानं सर्वसामान्य महिलांना ते विकत घेणं कसं परवडेल असा प्रश्न अनेकांनी विचारला होता, यात अक्षयही अग्रस्थानी होता.

अखेर सॅनिटरी पॅड करमुक्त केल्यानंतर अक्षय, ट्विंकल आणि मुरुगानंथम यांनी स्वत: सरकारचे आभार मानले आहेत.