आठवडय़ाची मुलाखत : अमेय वाघ (अभिनेता)

जगभरातून एका सेकंदाला तब्बल २८ लाखांहून अधिक यूटय़ूब व्हिडीओज पाहिले जातात. यात भारताचा वाटा मोठा आहे. देशात यूटय़ूब व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या वर्षांगणिक ४०० पटीने वाढत आहे. या सर्वात भारतीय प्रादेशिक भाषांचे व्हिडीओज पाहण्याची संख्या सर्वाधिक असली तरी मराठी मात्र यामध्ये मागे आहे. यूटय़ूबचा  ‘फॅनफेस्ट’ नुकताच मुंबईतील बीकेसीमध्ये पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून या फॅनफेस्टमध्ये भारतीय भाषांना स्थान दिले जाऊ लागले आहे. मात्र हे तिन्ही वर्ष दक्षिण भारतीय भाषांमधील कलाकारांना स्थान मिळाले आहे. यात मराठी अजून पिछाडीवर का आहे याबाबत ‘कास्टिंग काऊच’ या मराठी यूटय़ूब मालिकेतील कलाकार अभिनेता अमेय वाघ याच्याशी मारलेल्या गप्पा.

* भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या यूटय़ूब मराठी वाहिनीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाही आजही ‘फॅनफेस्ट’मध्ये मराठी कलाकारांना संधी का नाही?

यूटय़ूबच्या फॅनफेस्टमध्ये ज्या वाहिन्यांना दहा लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत चाहते आहेत त्यांची निवड केली जाते. ‘फॅनफेस्ट’मध्ये जाणे हे आमचेही स्वप्न असून ते गाठण्यासाठी अजून अनेक आव्हाने पार करावी लागतील. अनेक जण प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश मिळण्यास काही कालावधी द्यावा लागेल. अर्थात आपण या माध्यमात फार उशिरा प्रवेश केला आहे. यामुळे आपले बहुतांश प्रेक्षक हे इतर भाषांकडे वळले आहेत. त्यांना मराठीकडे वळविण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. व्हिडीओच्या निर्मितीचा दर्जा, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेराचा दर्जा, चित्रीकरणानंतरची प्रक्रिया या सर्व गोष्टी व्हिडीओला अधिक प्रेक्षकसंख्या मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

* मराठीत आपण यूटय़ूबच्या चित्रीकरणासाठी अशी गुंतवणूक करतो का?

‘भाडिपा’मध्ये अशी गुंतवणूक केली आहे. आम्ही एका स्टुडिओमध्ये याचे रीतसर चित्रीकरण करून ते पोस्ट करत असतो. यामुळेच ‘कास्टिंग काऊच’सारख्या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता या मालिका लोकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत. यूटय़ूबने आम्हाला ‘फॅनफेस्ट’ला बोलावले नसले तरी यूटय़ूबतर्फे आमच्या मालिकेची दखल घेतली जाऊ लागली आहे. समाजमाध्यमांवर यूटय़ूबने आमच्या मालिकेचे कौतुक केले आहे, तर नवीन प्रेक्षकांतर्फे मालिकेची शिफारसही केली जाऊ लागली आहे.

* ‘भाडिपा’च्या मालिका लोकांपर्यंत पोहोचविल्या जाव्या यासाठी नेमके काय केले जाते?

यासाठी अर्थातच फेसबुकचा वापर होतो, पण फेसबुकवरही आता जाहिराती केल्यावर त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. यामुळे खूप कल्पकतेने प्रसिद्धी करावी लागते. आमचे फेसबुक पान आहे तेथे आम्ही भाडिपच्या प्रत्येक मालिकेची प्रसिद्धी करत असतो. तेथूनच आम्हाला प्रेक्षकवर्ग मिळत असतो. याशिवाय चाहत्यांमध्ये होणाऱ्या चर्चामधूनही मालिकांची माहिती नवीन लोकांना मिळत असते. आज भाडिपाला खूप नियमित प्रेक्षक मिळत आहेत. हे प्रेक्षक आम्हाला भेटतात तेव्हा आमच्या यूटय़ूबवरील मालिकांचे कौतुक करतात. एखाद्या कलाकाराला आपण आपल्या चाहत्याला सर्व प्रकारच्या मनोरंजन माध्यमातून आवडतो ही बाब खूप सुखावह असते. आता डिजिटल माध्यमातील कामाचीही प्रशंसा होऊ लागली आहे.

* यूटय़ूबवरील व्हिडीओजमध्ये सरसकट शिव्यांचा वापर केला जातो. तेथेही सेन्सॉरशिप यावी अशी मागणी आहे. याचबरोबर तसे प्रयत्नही सुरू आहेत. याबाबत तुझे काय मत आहे.

मुळातच सेन्सॉरशिप नसावी असे माझे स्पष्ट मत आहे. वास्तववादी कला सादर करत असताना अनेकदा दैनंदिन जीवनातील भाषेचा वापर केला जातो. मुळात हा वापर करण्याची गरज असते. यामुळे मला कोणती भाषा आवडते व मी कोणत्या भाषेचे व्हिडीओज पाहावेत याचा निर्णय प्रेक्षकांनी घेणे केव्हाही योग्य ठरते. यामुळे सेन्सॉरशिप ही भानगड न ठेवता ती भाषा किंवा दृश्ये चांगली आहेत की वाईट याचा निर्णय प्रेक्षकांना घेऊ द्यावा. सेन्सॉरने कोणत्या वयोगटासाठी कोणती भाषा वापरावी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत. मात्र सरसकट अशा गोष्टी करूच नये असे सांगणे चुकीचे आहे.

* आपल्या लोकप्रिय कलाकारांना ऑफलाइन भेटण्यासाठी संधी मिळावी यासाठी यूटय़ूबने फॅनफेस्ट सुरू केला. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना अशा काही संधी देणार आहात का?

होय. आम्हीही आमचा एक फॅनफेस्ट आयोजित करणार आहोत. येत्या १ एप्रिल रोजी आम्ही आमच्या चाहत्यांना भेटणार आहोत. ‘कास्टिंग काऊच’ या मालिकेचे चित्रीकरण ज्या ठिकाणी होते त्या सितारा स्टुडिओमध्ये चाहत्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असला तरी जागा मर्यादित आहेत. याचा तपशील आमच्या फेसबुक पानावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा फॅनफेस्ट होत असला तरी यूटय़ूबच्या फॅनफेस्टमध्ये सहभागी होण्याचे आमचे स्वप्न कायमच आहे.

मुलाखत : नीरज पंडित