करोना विषाणूमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला असून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील अनेक कलाकारदेखील नागरिकांना घरीच रहा, काळजी घ्या असं सांगत आहेत. यात अभिनेता अमिताभ बच्चनसुद्धा मागे नाहीत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यापासून बिग बी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असून त्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. तसंच सध्याच्या परिस्थितीवर त्यांचं मतही व्यक्त करत आहेत. अलिकडेच त्यांनी करोनावर आधारित एक कविता शेअर केली होती. त्यानंतर आता एक नवीन पोस्ट  शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.  २०२० हे वर्ष डिलीट करुन पुन्हा इन्स्टॉल करावं, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकांना या विषाणूची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशावर जी परिस्थिती ओढावली आहे ती पाहून अमिताभ यांना हे वर्ष डिलीट करण्याची इच्छा होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘२०२० हे वर्ष आपण डिलीट करुन पुन्हा इन्स्टॉल करु शकतो? या व्हर्जनमध्ये व्हायरस आहे’,असं बिग बी म्हणाले आहेत.


दरम्यान, करोनामुळे देशात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे लॉकडाउन पाळण्यात येत आहे. यात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद आहे. यात कलाविश्वाचादेखील समावेश आहे. अनेक मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण अर्ध्यावरच आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहेत. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट अर्ध्यावरच रखडला आहे.