काही दिवसापूर्वी अभिनेता अनिल कपूरने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. अनिल कपूरने शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली होती. मात्र अनिल कपूरने पंतप्रधान मोदी यांची भेट का घेतली याच्या मागचं कारण स्पष्ट झालं नव्हतं. मात्र नुकतंच अनिल कपूरने या भेटीमागचं कारण आणि त्याचा अनुभव शेअर केला आहे.

नुकताच ‘टोटल धमाल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी अनिल कपूरने पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यानचे अनुभव शेअर केले.

‘पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचे ते क्षण खरंच फार अप्रतिम होते. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानादेखील मला भेट घ्यायची होती. मात्र काही कारणास्तव हे शक्य होत नव्हतं. यावेळी ते शक्य झालं, माझी भेट झाली. काही भेटीगाठी या नशिबात लिहील्या असतात आणि त्याप्रमाणे होतं सुद्धा’, असं अनिल कपूर म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती आणि ते मला खरोखरच भेटलेदेखील. त्यांच्याकडून फार गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचं व्यक्तीमत्व प्रेरणा देणारं आणि आशयदायी आहे’.

दरम्यान, अनिल कपूर लवकरच ‘टोटल धमाल’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यापूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या गाण्यावर आधारित अनिलचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनिल व्यतिरिक्त सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला यांच्या मुख्य भूमिका आहेत. विधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून हा एक रोमाँटिक चित्रपट आहे.