प्रतिज्ञा या मालिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेता अनुपम श्याम यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी आहेत. त्यामुळे सध्या गोरेगावमधील लाइफलाइन या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या काळात आर्थिक समस्या भेडसावत असल्यामुळे त्यांच्या भावाने अनुराग श्याम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदत मागितली होती. विशेष म्हणजे त्यांची पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेता सोनू सूद आणि मनोज बाजपेयी त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

अनुपम आजारी असल्याचं समजताच त्यांच्या चाहत्यांनी सोनू सूद आणि आमिर खान यांच्याकडे मदत मागितली होती. परंतु, सोनू सूदसोबत मनोज बाजपेयी अनुपम यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर सोनू सूदला अनुपम यांच्या प्रकृतीविषयी समजताच त्याने ट्विट करुन अनुपम यांच्या भावाच्या अनुराग श्याम आणि संबंधीत डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं.

दरम्यान, ‘गेल्या सहा महिन्यांपासून अनुपम हे आजारी आहेत. त्यांच्या मूत्रपिंडाला संसर्ग झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून ते हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. पण त्यांना डॉक्टरांनी वेळच्या वेळी डायलिसिस करण्यास सांगितले होते. डायलिसिसचा खर्च खूप असल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही’, असं अनुराग यांनी एका मुलाखतीत सांगितलं.