बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या जीमवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. जुहू येथील राहत्या घरी अवैध बांधकाम केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी नोटीस पाठविण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार अर्जुनने त्याच्या जुहू येथील घराच्या गच्चीवर कोणत्याही परवानगीशिवाय ३०x१६ फुट इतक्या मापाच्या एका खोलीचे बांधकाम करून अतिक्रमण केले होते. या ठिकाणी त्याने व्यायामाची व्यवस्था केली होती. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने विचारणा करण्यासाठी अर्जुन आणि त्याच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी मेसेज किंवा दूरध्वनीचे उत्तर न देता सदर प्रकरणी मौन बाळगले होते. त्यानंतर पालिकेने अखेर हे अधिकृत बांधकाम उदध्वस्त केले आहे. दरम्यान ही कारवाई करताना आलेला १० हजार रुपयांच्या खर्चाची वसुली देखील अर्जुन कडूनच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

अर्जुन कपूर सध्या जुहू येथील रहेजा ऑर्किड या इमारतीत ७ व्या मजल्यावर राहतो. दरम्यान, या इमारतीतील कोणत्याही रहिवाशांनी महानगरपालिकेकडे तक्रार केलेली नाही, तर त्या इमारतीबाहेरील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबईकडे या अवैध बांधकामाबद्दल तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पालिकेल्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीबद्दल तपास केला. दरम्यान, मार्च महिन्यात या प्रकरणी पहिली नोटीस अर्जुनला पाठविण्यात आली होती. हे अवैध बांधकाम पाडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांन त्याच्या मालमत्तेमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी दुसरी नोटीसही अर्जुनला पाठविण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्या नोटीसनंतर पालिकेने त्याच्या अधिकृत बांधकामावर कारवाई केली.

अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘मुबारकाँ’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात अर्जुन आणि अभिनेता अनिल कपूर अशी काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अर्जुन आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण, म्हणजे मलायका अरोरा आणि त्याची वाढती मैत्री. अरबाज आणि मलायका विभक्त होण्याच्या निर्णयामध्ये अरबाज-मलायकामध्ये तिसरा व्यक्ती आल्याची चर्चा रंगत होती. बॉलिवूडची ही जोडी फुटण्यामागे अर्जुन कपूर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुनसोबत मलायका अरोरा खानमधील वाढत्या मैत्रीमुळे ती अरबाजपासून दूर होत असल्याच्या चर्चाही बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या.