30 October 2020

News Flash

उषा नाडकर्णी यांनी ‘माहेरची साडी’मधील आठवणी सांगत आशालता यांना वाहिली श्रद्धांजली

आशालता यांच्या निधनामुळे उषा नाडकर्णी झाल्या भावूक

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं करोनामुळे निधन झालं. सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७९ वर्षांच्या होत्या. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आशालता यांच्यासोबतच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी आशालता यांच्या अभिनय कौशल्याची स्तुती केली. “आशालता खूप शांत, नम्र आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. आम्ही माहेरची साडी या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी प्रत्येक सीनच्या वेळी त्यांनी माझी मदत केली होती. अनेकदा कलाकारांना त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असलेल्या व्यक्तिरेखा साकाराव्या लागतात. अशा भूमिका वठवताना कसा विचार केला जातो? एखादा सीन कसा रंगवला जातो? व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी तयारी कशी केली जाते? यांसारख्या अनेक लहान लहान पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मला प्रचंड दु:ख झालं. मी एक खूप चांगली मैत्रीण गमावली” असा अनुभव सांगत उषा नाडकर्णी यांनी आशालता यांना श्रद्धांजली वाहिली.

आशालता या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंगसाठी साताऱ्यात आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आशालतांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्या मूळच्या गोव्याच्या असून त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 3:40 pm

Web Title: actor ashalata wabgaonkar usha nadkarni maherchi sadi mppg 94
Next Stories
1 ‘आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या’; सुबोध भावे भावूक
2 अभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा
3 अनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस
Just Now!
X