प्रसिद्ध मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर सोशल मिडियावर प्रंचंड सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच कुठली ना कुठली पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अलिकडेच चिन्मयने त्याला विमानतळावर आलेला एक सुंदर अनुभव फेसबुक पोस्टव्दारे शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने एका राजकीय नेत्याच्या साधेसरळ राहण्याच्या स्वभावाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ‘प्रकाश आंबेडकर’ आहेत. चिन्मय मांडलेकर याने त्यांच्यासोबतची नागपूर विमानतळावर झालेल्या भेटीचा अनुभव आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडला आहे.

काय म्हणाला चिन्मय?

“काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं “आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो”. पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं “अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत.”महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी. आय. पी ट्रीटमेंट नाही. एअरपोर्टवर बसायला ही जागा नसताना जवळ जवळ ४० मिनिटं ताटकळत उभे होते. अर्थात लोकं भेटत होती, फोटो काढत होती. आमची भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा मारत उभे राहिलो. राजकीय भुमिका पटो न पटो, पण माणसाचा साधेपणा कमाल आहे! आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारुन रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे. बाय द वे, ज्या एअरपोर्टवर हे झालं त्या एअरपोर्टला यांच्याच आजोबांचं नाव आहे. तरीही No VIP treatment! #Respect.”