19 February 2019

News Flash

अभिनेते दिगंबर नाईक यांच्या ‘कट टू कट’ पाच भूमिका!

कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते

दिगंबर नाईक

कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. कलाकारही अशा भूमिकांच्या शोधात असतात. एकाच नाटकात एकाच कलाकाराने वेगवेगळ्या भूमिका करण्याचा कल हळूहळू रंगभूमीवर रुजू लागला आहे. अभिनेते दिगंबर नाईक यांना आगामी ‘कट टू कट’ या नाटकात तशी संधी मिळाली असून ते या नाटकात एका स्त्री भूमिकेसह चक्क पाच भूमिका साकारत आहेत.
शुभानन आर्ट्स निर्मित आणि प्रवीण शांताराम लिखित ‘कट टू कट’ हे नाटक लवकरच रंगभूमीर दाखल होणार आहे. सद्य:परिस्थितीत घडणाऱ्या विविध घटनांचा आढावा नाटकाच्या कथानकातून विनोदी पद्धतीने घेण्यात आला असून नाटकाचे दिग्दर्शन प्रभाकर मोरे यांनी केले आहे.
‘आमच्या या घरात’, ‘येवा कोकण आपलाच असा’ आणि सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘टॉस’ या नाटकानंतर लेखक प्रवीण शांताराम यांचे हे वेगळ्या विषयावरील नाटक रंगभूमीवर येत आहे. दिग्दर्शक प्रभाकर मोरे ही गेली अनेक वर्षे रंगभूमीवर आहेत. विविध नाटके आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका व कार्यक्रमातून त्यांनी अभिनय केला आहे. या नाटकाद्वारे ते दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिगंबर नाईक यांनाही प्रेक्षकांनी विविध नाटके आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून पाहिले आहे. हे नाटक विनोदी असले तरी मालवणी नाही. नाईक यांनी या नाटकात पाच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नाटकात सविता हांडे, मयूर पवार, सुरेश चव्हाण, वृषाली चव्हाण, कमलाकर बागवे, हरीश मयेकर, प्रभाकर मोरे हे कलाकार आहेत. दिगंबर नाईक यांच्या पाच भूमिका हे नाटकाचे खास वैशिष्टय़ ठरणार असून त्यांच्या या विविधरंगी भूमिकांकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

First Published on December 3, 2015 1:36 am

Web Title: actor digambar naik play 5 roll