24 मार्चला भारतात लॉकडाउनची घोषणा झाली. या घोषणेनंतर देशभरातील नागरिक पुरते गोंधळले. अनेकांसाठी ही एक मोठी सुट्टी असली तरी नंतर मात्र अनेक प्रश्न पुढे उभे राहिले. मनोरंजन क्षेत्रालादेखील लॉकडाउनचा मोठा फटका बसला. लॉकडाउनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं. या काळत कलाकारांना घरी बसावं लागलं.

अभिनय दिग्दर्शन क्षेत्रात लोकप्रियता मिळवलेला हेमंत ढोमे याने लॉकडाउनच्या वर्षपूर्तीनिमित्ताने लोकसत्ताशी खास बातचीत केली. यावेळी मराठी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात लॉकडाउनचा काय परिणाम झाला याबद्दल त्याने अनेक गोष्टींवर मत मांडलं. तसचं लॉकडाउनचं हे वर्ष त्याच्यासाठी कसं होतं याचा अनुभवही त्याने शेअर केला आहे.

या लॉकडाउनचा फटका हेमंतलाही चांगलाच बसला. लवकरच हेमंत आणि क्षिती यांचा ‘झिम्मा’ सिनेमा रिलीज होतोय. मुळात हा सिनेमात गेल्यावर्षी मे महिन्यात रिलीज होणार होता. सिनेमाचं चित्रीकरणदेखील पूर्ण झालं होतं. मात्र लॉकडाउन जाहीर झाल्यानं प्रदर्शन रखडलं. ‘झिम्मा’ हा हेमंत आणि क्षितीची पहिलीच निर्मिती असलेला सिनेमा असल्यानं काही काळ दोघेही चिंतेत पडले. सिनेमाचं काय? हा प्रश्न त्यांना सतावू लागला.

या सगळ्या परिस्थितीवर कशी मात केली हे सांगताना हेमंत म्हणाला, “या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं. त्यावेळी सगळेच कठिण परिस्थितीचा सामना करत होते. ही परिस्थिती लवकच बदलेल अशी अपेक्षा होतीच. शिवाय ‘झिम्मा’ सिनेमातील कलाकारांनी वेळोवेळी धीर दिला आणि मनोबल वाढवलं.” असं हेमंत म्हणला. तसचं “या लॉकडाउनमुळे आजुबाजुच्या नात्यांबद्दल विचार करण्यासाठी एक मोठा काळ मिळाला. घरात कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. या काळात अनेक नव्या सिनेमांचे प्लॅन करता आले. आत्मपरिक्षण करण्याची संधी लॉकडाउनमुळे मिळाली.”

Video: गॅरीसाठी कसं होतं लॉकडाउनचं वर्ष?, अभिजीत खांडकेकरने शेअर केला अनुभव

दरम्यान लॉकडाउनच्या काळात मोठ्या संख्येने प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळाले . मात्र अशातही मराठी सिनेमा किंवा वेब सिरीजचं प्रमाण ओटीटीवर फारसं नाही. यावर हेमंतने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. “ओटीटी प्लॅटफॉर्मला मराठी कंन्टेटची गरज कमी आहे. मराठी मध्ये दर्जेदार सिनेमे येतात मात्र प्रेक्षकांचा तो पाहण्याचा कल कमी आहे. मराठी प्रेक्षकांचा हिंदी, साउथचे सिनेमे पाहण्याकडे जास्त कल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी कंन्टेट पाहण्यासाठी जास्त प्रेक्षक नसल्यानं तिथं मराठी सिनेमा किंवा वेब सीरिजचं प्रमाण कमी आहे.” असं हेमंत म्हणाला.
शिवाय सामान्य कुटुंबात आजही टीव्हीवर मालिका पाहणं जास्त पसंत केलं जातं असल्याचं हेमंतचं म्हणणं आहे. लॉकडाउनच्या काळात मालिका बंद असल्या तरी मालिका पुन्हा सुरु झाल्यावर प्रेक्षक मालिकांशी जोडले गेले असं तो म्हणतो. हेमंतने लॉकडाउनच्या काळात मनोरंज क्षेत्रात पडद्यामागील कलाकारांसाठी केल्या गेलेल्या कामाबद्दलही सांगितलं.

हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ सिनेमा 23 एप्रिलला प्रदर्शित होतोय. या सिनेमात निर्मिती सावंत, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर अशी बरीच कलाकार मंडळी आहे.