अभिनेता एजाज खान याला मंगळवारी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) विमानतळावरून ताब्यात घेतले.

गेल्या आठवड्यात एनसीबीने शादाब शेख उर्फ शादाब बटाटा या अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. चित्रपट सृष्टीशी संबंधित व्यक्तींना मागणीप्रमाणे विविध अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचे नाव पुढे आले होते. मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाज याला एनसीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे एनसीबीच्या विभागीय कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

एजाजला ताब्यात घेतल्याच्या वृत्तास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दुजोरा दिला. एजाजशी संबंधीत काही मालमत्तांवर एनसीबी अधिकाऱ्यांनी शोधाशोध केल्याचे समजते.