05 August 2020

News Flash

तारांगण घरात : नव्या रूपात ‘चिवित्रा’

सध्या सुरू असलेल्या ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेप्रमाणेच याही पुस्तकात उतारवयातील विवाह चितारला आहे.

गिरीश ओक

टाळेबंदी सुरू झाली तेव्हा या प्रकरणाला इतके गंभीर वळण मिळेल असे वाटले नव्हते, त्या वेळी मी वाईमध्ये अडकलो होतो. घरी आमचे मांजर एकटेच होते. त्याची काळजी घ्यायला एक काकू बाहेरून रोज येत असत, पण सोसायटीत बाहेरील व्यक्तींना येण्यास मज्जाव केल्याने पुढे त्यांचेही येणे कठीण झाले. काही दिवस शेजारच्यांनी सहकार्य केले; परंतु नंतर मात्र आम्हाला मुंबई गाठण्याशिवाय पर्याय उरला नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ३ एप्रिलला मुंबईत परतलो. गावी या परिस्थितीचा अंदाज आला नाही; परंतु मुंबईत आल्यानंतर मात्र त्याचे गांभीर्य अधिक समजू लागले, अशी आठवण अभिनेते गिरीश ओक यांनी सांगितली.

गेले काही दिवस चित्रीकरण, नाटक सातत्याने सुरू असल्याने आता टाळेबंदीच्या काळात घरात काय करायचे, असा प्रश्न होताच. सुरुवातीला घरातली कामे वाटून घेतली. घरातल्या केरवाऱ्यापासून फरशी पुसण्यापर्यंत सर्व कामे मी आवडीने करतो. या काळात स्वत:तली सकारात्मकता टिकून राहणे गरजेचे असल्याने वाचन, गायन आणि कुटुंबीयांसोबत विविध विषयांवर गप्पा मारणे सुरू असते. जगातील घडामोडी पाहण्यासाठी तासभर बातम्यांसाठी दिला जातो, अशी रोजच्या दैनंदिनीची माहिती त्यांनी दिली. रोजच्या कामांबरोबरच ‘नारायण धारप’ या आवडत्या लेखकाच्या पुस्तकांचे वाचन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मागे त्यांचे समग्र साहित्य मी घरी आणले होते. त्यांच्या भयकथा, रहस्यकथा प्रसिद्ध आहेत, पण ‘उत्तररंग’ हे पुस्तक काहीसे विशेष आहे. सध्या सुरू असलेल्या ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेप्रमाणेच याही पुस्तकात उतारवयातील विवाह चितारला आहे. सध्या या पुस्तकाचे वाचन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी लोकसत्ताच्या चतुरा पुरवणीसाठी मी ‘चिवित्रा’ नावाचे सदर लिहीत होतो. आता तेच लेख यूटय़ूबच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी त्यांचे अभिवाचन आणि चित्रीकरणात रमले असल्याचेही त्यांनी सांगितले. यूटय़ूबवरील ‘चिवित्रा’ वाहिनीवर याचे दोन भाग प्रसारित झाले असून येत्या गुरुवारी तिसरा भाग प्रसारित होणार आहे. घरच्या घरीच कॅमेरा, मोबाइल आणि काही अ‍ॅपच्या माध्यमातून हे चित्रीकरण सुरू आहे. यात पत्नीची आणि मुलीची मोलाची साथ मिळते आहे, अशी माहिती गिरीश ओक यांनी दिली. एरवी १३-१४ तास चित्रीकरण, प्रयोग, कार्यक्रम यातून कलाकाराला काहीशी विश्रांती हवी असते, पण ती काहीशीच हवी असते. त्यानंतर व्यग्र आयुष्य, चित्रीकरण, प्रयोग हे कलाकाराला हवेहवेसेच असतात. आता टाळेबंदीमुळे घरातही सृजनता आणि सकारात्मकता टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. वाचन, अभिवाचन, ऑनलाइन माध्यमातून लोकांना भेटणे, सादरीकरण करणे अशा अनेक गोष्टी सुरू आहेत. विशेष म्हणजे काही अ‍ॅपच्या माध्यमातून जुन्या गीतांचे सादरीकरण आणि ध्वनिमुद्रण करणे सुरू आहे. यातून एक वेगळाच अनुभव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सादरीकरण करणे, आपल्यातल्या कलेला न्याय देणे, लोकांपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक कलावंताचे ध्येय असते. त्यामुळे या काळात त्याने स्वत:ला समृद्ध करावे. परिस्थिती अत्यंत कठीण आहे; परंतु यातही आपण सकारात्मकता सोडता कामा नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

संकलन – नीलेश अडसूळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 1:50 am

Web Title: actor girish oak activities in lockdown zws 70
Next Stories
1 करोनाष्टक : वर्तमानपत्रांतील कात्रणांचा संग्रह
2 तारांगण घरात : वेबमालिका आणि वाचन
3 करोनाष्टक : गुढीपाडवा ऑनलाइन झाला
Just Now!
X