अभिनेता इरफान खान सध्या काविळने त्रस्त झाला आहे. त्याच्या या आजारामुळेच त्याच्या सिनेमांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. इरफानला द मिनस्ट्री या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पंजाबला जायचे होते. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर लगेच तो ब्लॅकमेल या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार होता. पण आता काविळ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. सध्या इरफानची टीम पुढील तारखांच्या जुळवा जुळव करण्यात व्यग्र झाली आहे.

इरफान अॅमेझॉनच्या प्राइम व्हिडिओ सीरिजमध्ये ‘द मिनस्ट्री’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणालाही तो लवकरच सुरूवात करणार आहे. हे संपूर्ण वर्ष इरफानसाठी फार खास आहे. या दोन सिनेमांनंतर तो हिंदी मीडियम- २ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. इरफानच्या कुटुंबियांबद्दल फारसे बोलले जात नाही. इरफानच्या करीब करीब सिंगल या सिनेमाची निर्मिती त्याची पत्नी सुतापा सिकंदरने केली आहे.

आपल्या पत्नीबद्दल बोलताना इरफान म्हणाला की, ‘सुतापा ही माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. आम्ही कोणत्याही विषयावर दिलखुलास गप्पा मारु शकतो. आमच्या गप्पांच्या ओघातच सुतापाने करीब करीब सिंगल सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही एकाच शाळेत शिकलो. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजतात.’ तनुजा चंद्रा दिग्दर्शित करीब करीब सिंगल सिनेमात इरफानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वतीने मुख्य भूमिका साकारली होती.