करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. त्यांचे आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशीच काहीशी अवस्था अभिनेता करण खंडेलवाल याची झाली आहे. आर्थिक टंचाईमुळे त्रस्त असलेल्या करणने मुंबई सोडून थेट केरळमधील आपलं गाव गाठलं. आश्चर्याची बाब म्हणजे एक हजार ४०० किलोमीटर गाडी चालवत तो आपल्या गावी पोहोचला.

करण खंडेलवाल छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता आहे. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे तो प्रसिद्ध झाला होता. करोना विषाणूमुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने काही चकित करणारे खुलासे केले. तो म्हणाला, “लॉकडाउनमुळे माझे काही प्रोजेक्ट बंद करण्यात आले. त्या प्रोजेक्टचे पैसेही मला अद्याप मिळालेले नाहीत. पैशांअभावी मुंबईमध्ये दिर्घकाळ राहणं मला शक्य नव्हतं. परिणामी मी काही काळासाठी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. १४०० किलोमीटर गाडी चालवत मी केरळमध्ये माझ्या गावी पोहोचलो.”

लॉकडाउनमुळे ठप्प झालेला मनोरंजन उद्योग आता हळूहळू सुरु होत आहे. सरकारने नियमांचे पालन करुन शूटिंग करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी काही मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण आता सुरु करण्यात आले आहे. मात्र अनेक मालिका लॉकडाउनच्या काळात आर्थिक टंचाईमुळे रातोरात बंद करण्यात आल्या. या मालिकांमधील कलाकार आता नव्या प्रकल्पांच्या शोधात आहेत.