हॉलिवूड सुपरस्टार मार्क ब्लम यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोनाची लागण झाली होती. ते ६९ वर्षांचे होते. न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘डेस्परेटली सीकिंग सुजान’, ‘क्रोकोडाइल डंडी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही महिन्यांपूर्वीच ते नेटफ्लिक्सवरील ‘यू’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. १९७० मध्ये मार्क यांनी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्येही काम केलं. याशिवाय ‘शॅटर्ड ग्लास’ आणि ‘द गुड वाइफ’ या चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘शॅटर्ड ग्लास’ हा चित्रपट अमेरिकी पत्रकार स्टीफन ग्लास यांच्या जीवनावर आधारित होता.

https://www.instagram.com/p/B-NZ4cnooM2/

आणखी वाचा : ‘इटलीकडून धडा शिकलोच नाही हे लाजिरवाणं’; सोनू निगम संतापला

हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मार्क ब्लम यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. गायिका व अभिनेत्री मडोनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मार्क यांना श्रद्धांजली दिली. मडोना व मार्क यांनी ‘डेस्परेटली सीकिंग सुजान’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दरम्यान ANI ने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.