जगभरासह भारतात करोना विषाणूने सध्या धुमाकूळ घातला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु यासारख्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारतर्फे उपाय केले जात आहेत. यामध्ये सर्व वाहतूक व्यवस्था बंद करुन लोकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याचसोबत परदेशातून भारतात आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन, त्यांच्यात करोनाची लक्षण आढळल्यास त्यांनाही होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे.

करोनामुळे नेहमी घड्याळाच्या काट्यावर पळणारी मुंबई आज अचानक थांबली आहे. अनेक नोकरदार घरातून काम आहेत. २१ दिवसांच्या या काळात अनेक लोकं नवीन छंद जोपसण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व व्यक्तींसाठी अभिनेता आणि मॉडेल मिलींद सोमणने एक व्यायाम सांगितलेला आहे. मिलींदने आपली पत्नी अंकिताला पाठीवर बसवत पुश-अप्स मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ मिलींदने ट्विटरवर पोस्ट केलाय…”व्यायाम करायला वेळ मिळत नाही असं म्हणणाऱ्यांनी या दिवसांचा सदुपयोग करत हा व्यायम करण्याचा प्रयत्न करा”, असं मजेशीर आवाहन मिलींदने केलं आहे.

करोनाच्या काळात जिवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींसाठी सामन्य मुंबईकर धावून येत आहे. पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, पालिका कर्मचारी यांच्या जेवणाची सोय केली जात आहे. प्रशासकीय पातळीवर करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यामध्ये आता सरकारला यश कधी मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.