दूरदर्शनवर पुन्हा एकदा शक्तिमान मालिका प्रसारित होत असल्याने अनेकांना ९० च्या दशकातील बालपणाची आठवण झाली आहे. ९० च्या दशकात ही मालिका प्रचंड गाजली होती. लहान मुलांना तर भारताच्या या पहिल्या सुपरहिरोने वेड लावलं होतं. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, इतकी प्रसिद्धी मिळूनही शक्तिमान मालिका अचानक बंद करण्यात आली होती. मालिकेचा शेवट न दाखवताच ती बंद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. शक्तिमान मालिका बंद करण्यासंबंधी अनेक दावे केले जातात

९० च्या दशकातील मुलांसाठी शक्तिमान मालिका बालपणीचची एक आठवण आहे. १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २०१५ पर्यंत ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका निभावली होती. या कार्यक्रमाचे निर्मातादेखील तेच होते. प्रचंड प्रसिद्दी आणि टीआरपी मिळाल्यानंतरही ही मालिका एक दिवस अचानक बंद करण्यात आली.

शक्तिमान मालिका त्यावेळी अनेक कारणांमुले चर्चेत होती. कधी दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांसोबत झालेला वाद तर कधी शक्तिमानची कॉपी करण्याच्या प्रयत्नात लहान मुलांनी गच्चीवरुन उडी मारुन झालेल्या मृत्यूंमुळे ही मालिका चर्चेत असायची. लहान मुलांच्या आत्महत्या वाढल्यानेच शक्तिमान मालिका बंद करण्यात आली असाही एक दावा करण्यात आला होता. पण मुकेश खन्ना यांनी कधीही ही गोष्ट मान्य केली नाही. आपला कार्यक्रम पाहून लहान मुलं जीव धोक्यात घालत असल्याने कार्यक्रम बंद झाल्याचा दावा ते खोटा असल्याचं सांगतात.

मुकेश खन्ना यांनी दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे कार्यक्रम बंद झाल्याचं सांगितलं आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी खुलासा केला होता की, “मालिका प्रसारित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत दूरदर्शन वारंवार वाढ करत होतं. ज्यामुळे मालिका सुरु ठेवणं आपल्याला कठीण जात होतं”. मुकेश खन्ना यांनी सांगितल्यानुसार, “शक्तिमान मालिका आधी शनिवारी सकाळी आणि मंगळवारी संध्याकाळी प्रसारित होत होती. प्राइम टाइम नसतानाही लोकांना हा कार्यक्रम प्रचंड आवडत होता. त्यावेळी मालिका प्रसारित होण्यासाठी मुकेश खन्ना यांनी दूरदर्शनला तीन लाख ८० हजार रुपये द्यावे लागत होते. १०० ते १५० एपिसोड पूर्ण होईपर्यंत असंच सुरु होतं”.

“मालिकेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर दूरदर्शनने रविवारी प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. रविवारी लहान मुलांना सुट्टी असते असा तर्कही त्यांनी लावला. यासाठी मला ७ लाख ८० हजार रुपये द्यायचे होते. पुढील वर्षी मालिकेचे १०४ एपिसोड होते आणि मला १० लाख ८० हजार रुपये देण्यास सांगण्यात आलं. नंतर मला कळालं की ही रक्कम वाढवून १६ लाख करण्याची चर्चा सुरु आहे. मी त्याचा विरोध केला. पण त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. इतके पैसे देणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे इच्छा नसतानाही मला शक्तिमान मालिका बंद करावी लागली,” असं मुकेश खन्ना यांनी सांगितलं आहे.

मुकेश खन्ना यांनी गेली अनेक वर्ष शक्तिमान पुन्हा एकदा टीव्हीवह आणण्याचा प्रयत्न केला. पण मार्व्हल कॉमिक्सच्या या शतकात शक्तिमानला पुन्हा एकदा पडद्यावर आणणं खूप मोठं आव्हान आहे. अनेक निर्मात्यांनी मुकेश खन्ना यांच्याकडून शक्तिमानचे हक्क विकत घेण्यासाठी प्रयत्न केला. पण मुकेश खन्ना कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने शक्तिमानशी जोडले राहायचं आहे.