प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन झालं आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता त्यांनी आपल्या फार्म हाऊसवर अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. ते ५५ वर्षाचे होते. हा त्यांना आलेला तिसरा ह्रदयविकाराचा झटका होता. बिहारमधील मधुबनी येथे नरेंद्र झा यांचा जन्म झाला होता. जेएनयूमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं होतं. १९९२ मध्ये नरेंद्र झा यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

जाहिरातींमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारे नरेंद्र झा टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होतं. हिंदीव्यतिरिक्त तामिळ, तेलुगू भाषांमधील चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. नरेंद्र झा यांनी दोन डझनहून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हैदर, घायल वन्स अगेन, शोरगूल, हमारी अधुरी कहानी सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. रितीक रोशनच्या ‘काबिल’ आणि शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातही त्यांची प्रमुख भूमिका होती. सलमान खानचा आगामी चित्रपट ‘रेस 3’ मध्येही नरेंद्र झा यांची महत्वाची भूमिका होती. जवळपास ७० मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. टीव्ही मालिकांबद्दल बोलायचं झाल्यास नरेंद्र झा यांनी ‘बेगुसराय’, ‘छूना है आसमान’, ‘संविधान’ सारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. नरेंद्र झा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूडकरांना धक्का बसला आहे. काही दिवसांपुर्वीच श्रीदेवी, शम्मी आंटी आणि आता नरेंद्र झा यांचं निधन झाल्याने बॉलिवूडकर चिंतेत आहेत.

नरेंद्र झा यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. २०१५ मध्ये नरेंद्र झा यांनी सेन्सॉर बोर्डाच्या माजी सीईओ पंकजा ठाकूर यांच्याशी लग्न केलं होतं.