‘मंटो’, ‘ठाकरे’,’किक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. आजवर नवाजुद्दीनने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत त्याच्यातील अभिनयकौशल्य सादर केलं आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये काम करणारा हा अभिनेता केवळ पैशांसाठी चित्रपटांमध्ये काम करतो असा खुलासा त्याने स्वत: एका मुलाखतीत केला आहे.

छोटेखानी भूमिकांपासून ते मुख्य भूमिकांपर्यंत नवाजने विविध भूमिकांना न्याय दिला आहे. ‘सरफरोश’ चित्रपटातील लहान भूमिका असो किंवा ‘सेक्रेड गेम्स’मधील मुख्य भूमिका असो त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. मात्र, या भूमिका मी केवळ पैसे मिळवण्यासाठीच करतो. त्यासोबतच काम करणं महत्त्वाचं आहे,असं ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“हलक्याफुलक्या कथानकाचे चित्रपट करायचे नाहीत, असं माझं कधीच मत नव्हतं. कारण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही तिथे प्रत्येक प्रकारची नाटकं करायचो. त्यामुळे सगळ्या प्रकारचा अभिनय, भूमिका करणं हे अभिनेत्याचं काम आहे. अभिनेता एक अभिनेताच असतो. मग तो लहान भूमिका करणारा असो किंवा मोठी”, असं नवाज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “माझं अभिनयावर प्रेम आहे. मात्र, मी काही चित्रपट केवळ पैशांसाठी केले आहेत. ज्या चित्रपटांमध्ये मला चांगले पैसे मिळाले ते मी केले.पण त्याचसोबत ज्या चित्रपटांची कथा चांगली असेल ते चित्रपट मी नक्कीच करेन. मग त्यासाठी मला कमी पैसे मिळाले तरी चालतील. खरं तर मी सहसा चित्रपटांसाठी जास्त मानधन घेत नाही”.

दरम्यान, नवाजुद्दीनने आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं असून सिक्रेड गेम्स ही त्याची वेब सीरिज विशेष गाजली. या सीरिजमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली.