करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की गलरानी हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या तमिळनाडूमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

“मला गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाली. माझी प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर्स खुप चांगल्या प्रकारे माझ्यावर उपचार करत आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी लवकरच बरी होईन.” अशा आशयाचं ट्विट करुन निक्कीने करोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.