जम्मू-काश्मीरमध्ये महिन्याभरापासून नजरकैदेत असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री पूजा बेदी मैदानात उतरली आहे. आपल्या मैत्रीला जागलेल्या पूजाने सरकारकडे अब्दुल्ला यांच्या सुटकेचे आवाहन केले आहे. पूजा बेदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्या कुटुंबांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे तसेच ते दोघे वर्गमित्रही आहेत.

पूजाने पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि काही पत्रकारांना टॅग करुन सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये ती म्हणते, ओमर अब्दुल्ला यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून कैदेत ठेवण्यात आले आहे. ते माझे वर्गमित्र आहेत तसेच तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबियांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या सुटकेचा विचार करावा.

पूजाने पुढे म्हटले, “मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर ओमर यांच्या सुटकेसाठी काहीतरी योजना बनवेल. कारण, हे तर स्पष्ट आहे की कायमस्वरुपी त्यांना कैदेत ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारला यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल.”

जम्मू आणि काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवल्याच्या एक दिवस आधीपासूनच ओमर अब्दुल्ला, त्यांचे वडिल नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदत ठेवण्यात आले आहे.