गायींचा थंडीपासून बचाव करण्यासाठी अयोध्या महानगरपालिकेने त्यांना स्वेटर घालण्याची तयारी सुरु केली आहे. महानगरपालिकेने तेथील साधु-संत व सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. मात्र, मनपानं घेतलेल्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही यावर ट्विटवरून भाष्य केलं आहे.

राजकीय आणि सामाजिक घटनांवर भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांनी गायींना स्वेटर घालण्याच्या महापालिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. “घर, शाळा आणि नोकऱ्या नसणाऱ्या माणसांचे काय?” असे ट्विट त्यांनी केले आहे. प्रकाश राज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

अयोध्या महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. नीरज शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे गायींचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष ‘काऊ कोट’ तयार केले जात आहेत. आतापर्यंत १ हजार २०० गायींसाठी कोट तयार करण्यात आले आहेत. यासाठी महानगरपालिकेला प्रतिस्वेटर ३०० रुपये इतका खर्च करावा लागणार आहे.