सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. सध्या राज्यात सुरु असलेल्या या घडामोडींवर सोशल मीडियावर सर्वचजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी केलेल्या ट्विटने.

प्रकाश राज यांनी ट्विटरद्वारे महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आपले मत मांडले आहे. ‘#MahaShame ज्यांना नाचता येत नाही ते डान्स फ्लोअरला नावं ठेवत नाचणं बंद करतात’ (नाचता येईना पण अंगण वाकडे) असे म्हणत प्रकाश राज यांनी भाजपाला टोला मारल्याचे म्हटले जात आहे. सध्या त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK)ने ट्विटरद्वारे त्याची प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याने ट्विटमध्ये ‘आज अजित पवार धोबी के पप्पू बन गए है, ना घर के रहे ना घाट के’ असे म्हटले होते. या ट्विट पाठोपाठ कमालने आणखी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले होते.