अडेगाव-देवाडा मार्गावर व्याघ्र दर्शन

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये चित्रपट अभिनेता रणदीप हुडा याने मंगळवारी सकाळ व दुपारच्या सत्रात जंगल सफारी करून पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतला. पावसाळय़ात व्याघ्र पर्यटनासाठी पर्यटकांची संख्या कमी असते. मात्र अभिनेता हुडा यांना पावसाळी व्याघ्र पर्यटनातच पट्टेदार वाघाने दर्शन दिले. विशेष म्हणजे, तेलंगना येथे महिला वनपरिक्षेत्र अधिकारी अनिता हिला लोकप्रतिनिधीकडून झालेल्या मारहाणीचाही हुडा यांनी ट्विटरवरून निषेध केला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यावर्षी उन्हाळय़ात व्याघ्र दर्शनामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. देश-विदेशातून व्याघ्र दर्शनासाठी येथे पर्यटक आले. अतिविशिष्ट पर्यटकांनी सुद्धा यावर्षी ताडोबात हजेरी लावली. पावसाळय़ाला सुरुवात होताच १ जुलैपासून ताडोबा कोअर झोन बंद करण्यात आले आहे. मात्र, ताडोबात पावसाळी पर्यटन बफर झोनमध्ये सुरू आहे. मंगळवारला ताडोबा बफर क्षेत्रात पावसाळी पर्यटनासाठी चित्रपट अभिनेता रणदीप हुडा याने हजेरी लावली. मोहुर्ली येथे रिसोर्टवर रणदीपचा मुक्काम होता. त्याने मंगळवारी सकाळी व दुपारी अडेगाव- देवाडा या मार्गावर सफारी केली. सकाळच्या सफारीत हुडा यांच्या हाती निराशा आली. मात्र, दुपारच्या सत्रात त्यांना व्याघ्रदर्शन झाले.

व्याघ्रदर्शनाचा आनंद हुडा यांनी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत तसेच गाईड, जिप्सी चालक यांच्यासोबत साजरा केला. यावेळी त्यांनी मोहुर्ली विश्रामगृह येथे वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून वृक्ष महोत्सवाची सुरुवातही केली.

विशेष म्हणजे, हुडा यांनी लगतच्या तेलंगना राज्यात महिला वन अधिकारी अनिता हिला लोकप्रतिनिधीने केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल खेद व्यक्त केला. ताडोबातील वन्यजीव व जंगल बघून हुडा यांनी खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त केला, अशी माहिती ताडोबा बफर झोनचे उपवनसंरक्षक गुरू प्रसाद यांनी दिली.

 

‘मयूरी’ वाघिणीचं मन जिंकण्यासाठी ‘मोगली’ व ‘सम्राट’ वाघांमध्ये संघर्ष

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोगली आणि सम्राट या दोन वाघांमधील संघर्ष समाज माध्यमावर चर्चेचा विषय ठरली आहे. मयूरी या वाघिणीचं मन जिंकण्यासाठी हे दोन वाघ आपसात भिडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या लढाईत मोगली विजयी झाला आहे. येथे ८८ वाघ आहेत. ताडोबा, मोहुर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात या प्रकल्पाचा विस्तार झाला आहे.  १ जुलैला पर्यटक सौरभ कुर्वे यांनी बफर क्षेत्रातील नवेगाव भागात व्याघ्र सफारीचा आनंद घेतला. त्याचवेळी त्यांनी मोगली व सम्राट या दोन वाघांच्या लढाईचा प्रसंग टिपला आहे. हा व्हीडीओ सहा मिनिटांचा आहे.

 

ताडोबात व्याघ्र सफारी करताना चित्रपट अभिनेता रणदीप हुडा.