अभिनेता रणवीर शौरी याने ट्विटरवर घेतलेल्या एका पोलवरुन थेट पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा विरुद्ध काँग्रेस नेतृत्वासंदर्भातील काही ट्विट करत रणवीरने नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी की काँग्रेस खासदार राहुल गांधी असा प्रश्न रणवीरने विचारला होता. मात्र या पोलवरील प्रश्नावर काँग्रेस समर्थकांनी खोटे स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत रणवीरने हा पोल भाजपाच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा दावा केला. इतकचं नाही तर रणवीर हा भाजपाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असून तिथे त्याने पोलची लिंक पोस्ट केल्याचे व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉर्ट काँग्रेस समर्थकांनी ट्विट केले. मात्र हे स्क्रीनशॉर्ट खोटे असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं रणवीरने म्हटलं आहे.

भारतामधील काही विशिष्ट वर्गातील लोकं राहुल गांधी वगळता इतर कोणालाही विरोधकांचा चेहरा म्हणून समोर येऊ देत नाहीय. एखादा पर्याय उभा करण्याऐवजी ही लोकं राहुल गांधीच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यासाठी वाटेल ती कारणं देतील, अशा अर्थाचं ट्विट रणवीरने केलं होतं.

अशाप्रकारे राहुल गांधी यांना समर्थन करण्यामागील कारण म्हणजे मागील सहा दशकांमध्ये काँग्रेसने तयार केलेलं पैशांच्या पुरवठ्याचं आणि राजकीय शक्तीचं जाळं. यावरच हे पाठिंबा देणारे लोकं अवलंबून आहेत. हे जाळं नष्ट होऊ नये म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, असंही रणवीरने पुढील एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये रणवीरने एक पोल पोस्ट केला असून त्यामध्ये त्याने दोनच पर्याय उपलब्ध असतील तर तुम्ही कोणाला निवडाल? रागा (राहुल गांधी) की नमो (नरेंद्र मोदी)?, असा प्रश्न विचारला आहे. या पोलमध्ये आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांनी मत नोंदवलं आहे.

मात्र या पोलवर काही काँग्रेस समर्थकांनी एक व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत रणवीरने भाजपाच्या सांगण्यावरुन हा पोल पोस्ट केल्याचा दावा केला. या स्क्रीनशॉर्टबद्दल एकाने रणवीरला टॅग करुन त्याचं लक्ष वेधलं असता त्याने संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. “हा विजेंदर जैस्वाल काँग्रेसच्या सोशल मीडिया टीममधील आहे. त्याने खोटे आणि फेरफार केलेले स्क्रीनशॉर्ट शेअर करत मर्यादा ओलांडली आहे आणि ती ही केवळ एक ट्विटर पोल जिंकण्यासाठी. याची शिक्षा मिळणार आणि योग्य पद्धतीने मिळणार,” असं रणवीर म्हणाला आहे.

अन्य एका ट्विटमध्ये रणवीरने मी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलकडे केलेल्या तक्रारीमुळे खोटा स्क्रीनशॉर्ट शेअर करणाऱ्याने अकाऊंट डिलीट केल्याची शक्यता रणवीरने व्यक्त केलीय.

रणवीरने ट्विट केलेल्या पोलला १२ हजारांहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.