News Flash

रिमा लागू यांच्यामुळे आलोक नाथांपासून वाचले- संध्या मृदुल

'संस्कारी बाबुजी'चं आणखी एक असंस्कारी कृत्य उघड, संध्या मृदुलचा आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप

सेटवरच्या सगळ्याच सहकलाकारांनी मला खूप साथ दिली. पण, त्यावेळी रिमा लागू सतत माझ्यासोबत होत्या.

विनता नंदा आणि नवनीत निशान यांच्या आरोपांनंतर आता अभिनेत्री संध्या मृदुलनंही आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संध्या हिच्या आरोपांनंतर आलोक नाथ यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला आहे, चित्रीकरणाच्या काळात त्यांनी मला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. माझ्या रुममध्ये येऊन असभ्य वर्तन केलं असे अनेक गंभीर आरोप संध्यानं केले आहेत. मात्र त्यावेळी दिवंगत अभिनेत्री रिमा लागू या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांनी आलोक नाथ यांच्यापासून माझा बचाव केला असं सांगत संध्यानं अनेक कटू आठवणी सांगितल्या.

संध्या मृदुलनं ट्विट करत तिच्यासोबत आलोक नाथ यांनी केलेल्या गैरवर्तणुकीला वाचा फोडली आहे. ‘आलोक नाथ यांच्याविषयी मला खूपच आदर होता. या क्षेत्रात तेव्हा मी नवीन होते. त्यांच्या चांगुलपणामुळे आणि माझ्याप्रती असलेल्या चांगल्या वर्तनामुळे मी खूपच प्रभावित झाले. ते नेहमीच सेटवर मला मुलीसारखे वागवायचे. माझ्या कामाचं कौतुक करायचे, मात्र एकदिवशी त्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर आला.’ असं ट्विट करत पुढचे काही दिवस आलोक नाथ यांनी कसा आपला मानसिक छळ केला हे तिनं ट्विटर पोस्टमधून उघड केलं आहे.

‘एकदा मालिकेतील सगळ्यांसाठी डिनरचं आयोजन केलं होतं, मी काही कारणानं हॉटेल रुमवर परतली तेव्हा रात्र खूपच झाली होती. मद्यपान करून त्यादिवशी आलोक नाथ माझ्या रुममध्ये आले. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी लगड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वागण्यानं मला जबरदस्त धक्का बसला. मी स्वत:ला वाचवण्यासाठी रुमबाहेर पळ काढला.

ते माझ्या खोलीत तसेच बसून होते. शेवटी आम्ही कसंबसं त्यांना खोलीतून बाहेर काढलं. ते माझ्यावर ओरडत होते, माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचं यापूर्वी कधीही न पाहिलेला चेहरा मी त्यादिवशी पाहिला. मी प्रचंड मानसिक धक्क्यात होते. त्यावेळी माझी हेअरड्रेसर माझ्या खोलीत झोपली. तिच्यामुळे मी धक्क्यातून थोडी सावरली.

ते रोज मद्यपान करून येत. रोज ते फोन करून माझा छळ करायचे. हे सारं माझ्यासाठी खूपच असह्य व्हायचं. चित्रीकरणात पूर्णवेळ माझ्यासोबत माझी हेअरड्रेसर असायची. सेटवरच्या सगळ्याच सहकलाकारांनी मला खूप साथ दिली. पण, त्यावेळी रिमा लागू सतत माझ्यासोबत होत्या. आलोक नाथपासून त्यांनी मला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याकाळात मुलीसारखी त्यांनी माझी काळजी घेतली. आईसारख्या त्या माझ्यापाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या’ संध्या म्हणाली.

घटनेनंतर आलोक नाथ यांनी माझी माफी मागितली, आपण सुधारु असंही ते म्हणाले,पण या सगळ्यासाठी खूप उशीर झाला होता. कारण मी खूप मोठ्या मानसिक त्रासातून गेले होते, असं म्हणत संध्यानं संस्कारी बाबूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोक नाथ यांचं आणखी एक असंस्कारी कृत्य उघड केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 2:40 pm

Web Title: actor sandhya mridul accusses alok nath of sexual harassment
टॅग : MeToo
Next Stories
1 मी काहीच करू शकत नाही; आलोक नाथ यांच्या पत्नीने केले होते हात वर
2 सलीम-सुलेमानचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
3 Loveyatri box office collection : सलमानच्या १६० कोटींच्या अपेक्षेवर मेहुण्याने फेरले पाणी
Just Now!
X