24 November 2017

News Flash

हाफिज सईदच्या भूमिकेत संजय मोने

लूक टेस्टवेळी मेकअप केल्यावर मला लक्षात आलं, की मी बऱ्यापैकी हाफिज सईदसारखा दिसतो.

मुंबई | Updated: March 21, 2017 8:34 AM

संजय मोने

आगामी ‘शूर आम्ही सरदार’ या चित्रपटातून अष्टपैलू अभिनेता संजय मोने एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांपुढे येत आहेत. वाँटेड दहशतवादी हाफिज सईदची भूमिका मोने यांनी साकारली आहे. विशेष मेकअप वगैरे असलेली भूमिका त्यांनी पहिल्यांदाच केली आहे.
दहशवादाविरोधात तीन तरूण एकत्र येतात? त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का? या आशयसूत्रावर हा चित्रपट आधारित आहे.  गणेश लोके यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रकाश जाधव चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. इंडो ऑस एंटरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात गणेश लोके यांच्यासह शंतनू मोघे, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे असे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘आजवर मी अशा प्रकारची भूमिका केलेली नाही. मी हाफिज सईदसारखा दिसू शकतो आणि ही भूमिका साकारू करू शकतो हे कळणं यात दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. तशी प्रत्येकच भूमिका आव्हानात्मक असते, पण आजवर मी साकारलेल्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका माझ्यासाठी अधिक आव्हानात्मक होती.’ असं मोने म्हणाले. हाफिज सईदची भूमिका समजून घेण्यासाठी थोडी तयारी करावी लागली असंही त्यांनी सांगितलं. ‘लूक टेस्टवेळी मेकअप केल्यावर मला लक्षात आलं, की मी बऱ्यापैकी हाफिज सईदसारखा दिसतो. त्यामुळे काम सोपं झालं. युट्यूबवरून हाफिज सईदचे काही व्हिडिओज पाहिले आणि त्याला  समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात माझी भूमिका छोटी; मात्र लक्षवेधी आहे,’ असंही मोने यांनी सांगितलं.

या चित्रपटाची आणखीन एक विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया स्थित  गणेश लोके यांनी या चित्रपटाचं लेखन, प्रमुख भूमिका, सहदिग्दर्शन आणि निर्मिती केली असून ही चौफेर भूमिका अगदी चोखपणे बजावली आहे. येत्या २१ एप्रिलला ‘शूर आम्ही सरदार’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.

First Published on March 21, 2017 8:34 am

Web Title: actor sanjay mone playing hafiz saeed in upcoming shoor amhi sardar movie