News Flash

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच…

केंद्र सरकारनेही पन्नास टक्क्यांपेक्षा वाढीव क्षमतेसह प्रेक्षकांना प्रवेशाची मुभा दिली आहे.

|| मानसी जोशी

‘बाहुबली’च्या हिंदी अनुवादित चित्रपटाला अभिनेता शरद केळकरचा आवाज लाभल्यावर त्याची दखल अवघ्या चित्रपटसृष्टीने घेतली. केवळ अभिनय नाही तर नैसर्गिक आवाजाची देणगी लाभलेल्या या कलाकाराने डिस्ने हॉटस्टारवरील ‘लीजंड्स ऑफ हनुमान’ या अ‍ॅनिमेशनपटाला आवाज दिला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर माझ्या कामाचे कौतुक झाले. मी दिलेल्या व्हॉइसओव्हरची दखल समीक्षक तसेच प्रेक्षकांनी घेतल्याचे तो सांगतो. ‘लीजंड्स ऑफ हनुमान’ या चित्रपटामुळे हनुमानाबद्दल पुराणातील माहिती नसलेल्या गोष्टी समजल्या. लहानपणी आजी-आजोबांकडून रामायण आणि हनुमानाच्या गोष्टी ऐकत आलो आहे. यातून मला हनुमानाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले. पौराणिक कथा असली तरीही याची कथा साधी आणि सोपी आहे. अ‍ॅनिमेशन पटाविषयी सांगताना शरद केळकरने डबिंगची प्रक्रियाही समजावून सांगितली. कथेतील पात्र, ती व्यक्तिरेखा आणि अभिनयानुसार आवाजात चढउतार करावा लागतो. त्यासाठी तो आवाज व्यक्तिरेखेला चपखल बसेल का, याचीही चाचपणी केली जाते. मी आवाजासाठी  वेगळी मेहनत घेत नाही. सतत कामातूनच आवाजाचा पोत बहरत जातो, असेही त्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

करोनासंदर्भातील परिस्थिती निवळल्यावर लोक पार्टीला तसेच फिरायला सुट्टीसाठी बाहेर जातात तर मग चित्रपटगृहात जाण्यास प्रेक्षकांना का भीती वाटते? हा प्रश्न शरदने यावेळी उपस्थित केला. जोपर्यंत प्रेक्षक चित्रपट पाहणार नाही तोपर्यंत कमाई होणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त के ली. टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर परिस्थिती पूर्ववत होत आहे. करोनावर लसही आली आहे. मार्चनंतर चित्रपटगृहावर आधीसारखे हाऊसफुल्लचे बोर्ड्स झळकतील आणि आता केंद्र सरकारनेही पन्नास टक्क्यांपेक्षा वाढीव क्षमतेसह प्रेक्षकांना प्रवेशाची मुभा दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटही शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

दूरचित्रवाणी, चित्रपट आणि ओटीटी माध्यम अशा तिन्ही माध्यमांत विविधांगी भूमिका करणारा शरद निर्माता-दिग्दर्शकाने कलाकृती पडद्यावर मांडताना त्याचे भान ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करतो. आशय प्रदर्शित करताना ओटीटी माध्यमांनी तो १८ वर्षांवरील मुलांसाठी आहे का? त्यांचा प्रकार कोणता आहे? याविषयी स्पष्ट शब्दांत उल्लेख करायला पाहिजे. कथेची गरज असताना ते दृश्य वगळणे गैर आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असल्याचे मत त्याने व्यक्त केले. संदीप पाठकची प्रमुख भूमिका असलेला ‘इडक’ हा सुंदर मराठी चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला. त्याची निर्मितीही शरदने केली होती. भविष्यात चांगल्या मराठी चित्रपटात भूमिका साकारायची आहे, असे तो सांगतो.

लहान मुलांसाठी जास्त कलाकृतींची गरज

‘द लीजंड्स ऑफ हनुमान’ हा अ‍ॅनिमेशन पट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आहे. कोणत्याही वयाचे लोक या कलाकृतीशी समरस होऊ शकतात. आपल्याकडे अधिक अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती होणे आवश्यक आहे. कारण लहान मुलांना कार्टून तसेच दृक्श्राव्य माध्यमातून सांगितलेली एखादी गोष्ट पटकन समजते. येत्या पाच वर्षांत कार्टून्स तसेच डबिंग क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत व्हॉइसओव्हर आर्टिस्टची दखल घेणे आवश्यक आहे. ते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावतात, असेही तो म्हणतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 12:11 am

Web Title: actor sharad kelkar hindi translation of bahubali too much of anything is bad akp 94
Next Stories
1 ‘हॅशटॅग प्रेम’
2 प्रेक्षक प्रतीक्षा पूर्णत्वाची
3 आंदोलनावरची कल्लाकारी!
Just Now!
X