लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्वदच्या दशकातील काही मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘देख भाई देख.’ या मालिकेमध्ये अभिनेते शेखर सुमन, नवीन, फरीदा जलाल, भावना बलसावर, देवेन भोजानी, सुषमा सेठ, विशाल सिंग, नताशा सिंह या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ही मालिका दररोज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा दाखवण्यात येत आहे. पण आता शेखर सुमन यांनी मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेत होते याचा खुलासा केला आहे.

शेखर सुमन यांनी नुकताच ‘स्पॉटबॉय’ या वेब साइटला मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. अनेक चित्रपटांमध्ये काम करुनही हवी तशी भूमिका त्यांना मिळत नव्हती. एक दिवस अचानक त्यांना ‘देख भाई देख’ मालिकेची ऑफर आली. पण शेखर यांना मालिकांमध्ये काम करायचे नव्हते. मात्र आर्थिक परिस्थिती आणि मालिकेची निर्मिती जया बच्चन करत असल्यामुळे त्यांनी मालिकेस होकार दिला होता.

आणखी वाचा : ‘देख भाई देख’च्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या मुलाचा झाला होता मृत्यू, जाणून घ्या सविस्तर…

शेखर यांनी त्यावेळी मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतले होते याचा देखील खुलासा केला. ‘सुरुवातीला मला एका एपिसोडसाठी ५००० रुपये मिळायचे. महिन्यातून या मालिकेचे फक्त चार एपिसोड प्रदर्शित व्हायचे. पण एक एपिसोड शूट व्हायला जवळपास ६ ते ७ दिवसाचा कालावधी लागायचा. पण खरच हा खूप काही शिकवणारा अनुभव होता’ असे शेखर यांनी म्हटले.

‘देख भाई देख’ या मालिकेची निर्मीती जया बच्चन यांनी केली होती. छोटा पडदा जेव्हा नवा होता तेव्हाच जया बच्चन यांनी त्यात रस घेऊन ‘देख भाई देख’सारख्या धम्माल कौटुंबिक विनोदी मालिकेची निर्मिती केली होती. हा शो ६ मे १९९३ साली डीडी मेट्रोवर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी शोने ६५ एपिसोड पूर्ण केले होते.