मुंबई : नाटक ही कला करोनाकाळात आणि त्यानंतरही अव्याहत सुरू राहावी यासाठी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी ‘ओटीटी’चे दार खुले केले आहे. विविध नाटकांचे चित्रीकरण करून ‘ओटीटी’द्वारे त्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यानिमित्ताने नाटकांसाठीच्या स्वतंत्र ‘ओटीटी’ माध्यमाची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे.

टाळेबंदीच्या काळात नाटके ऑनलाइन दाखविण्याचा पर्याय सुचवला गेला. पुढे तसे प्रयोग झालेही, परंतु त्या संकल्पनेला काही कलाकारांकडून विरोधही झाला. असे असले तरी आता केवळ ऑनलाइन नाटकच नाही तर नाटकासाठी स्वतंत्र ‘ओटीटी’चे माध्यम खुले होत आहे. अभिनेते श्रेयस तळपदे यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली असून जानेवारी महिन्यात हे माध्यम सर्वासाठी खुले होणार आहे.

‘नाईनरसा’ असे या माध्यमाचे नाव असून मासिक सभासद नोंदणी स्वरूपात याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे नाटकाच्या शेवटच्या रांगेतील तिकिटापेक्षाही कमी दरात याचे मासिक सभासदत्व मिळणार आहे. ‘नाईनरसा म्हणजे रंगमंचावरील नऊ रसांची पूर्तता करणाऱ्या सर्व कलांचा यात समावेश असेल. नाटक, एकांकिका, दीर्घाक, अभिवाचन, नृत्य, गायन, कविता सर्वच. भारतीय भाषांसोबतच पाश्चात्त्य भाषेतील कलाकृतीही प्रेक्षकांना पाहायला मिळतील. बऱ्याच नाटकांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून १०० तासांचा आशय प्रक्षेपणासाठी तयार आहे. संजय नार्वेकर, सुशांत शेलार, अतुल परचुरे, आनंद इंगळे अशा अनेक दिग्गज कलाकारांची साथ याला मिळाली,’ असे श्रेयस तळपदे यांनी सांगितले.

अनेक नवीन मुलांकडे कौशल्य असूनही ते मागे राहतात. या निमित्ताने त्या मुलांना हक्काचे व्यासपीठ खुले झाले आहे. नव्या पिढीत दडलेली कला आम्ही लोकांपुढे आणत आहोत. नाटक ‘ओटीटी’वर आणण्याचा उद्देश असा की, बरेच लोक वेळेअभावी, नाटय़गृह जवळ नसल्याने नाटकाकडे पाठ फिरवतात. मात्र सामान्य माणूस कधीही, कुठूनही नाटकाचा आस्वाद घेऊ शकतो असे हे माध्यम आहे.

      – श्रेयस तळपदे, अभिनेता