अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला ४० वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला आज मुंबईतील  कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचे निधन झाले. छोट्या पडद्यावरील मोठा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कमी वेळेत त्याने अनेक चाहत्यांचे मनं जिंकली होती. दरम्यान, सिद्धार्थच्या जाण्याने अभिनेता सलमान खान सुद्धा भावूक झाला आहे.

बिग बॉस सीझन १३ मध्ये सिद्धार्थ शुक्लाला सलमान खानने अनेक वेळा फटकारले होते. सलमानने सिद्धार्थच्या स्वभावामुळे येणाऱ्या समस्यांबाबत त्याला अनेक वेळा सल्लाही दिला होता. एकदा सलमानने सिद्धार्थला रागावर नियंत्रण ठेवण्याच्या टिप्स दिल्या. सलमान आणि सिद्धार्थमध्ये असलेली खास बॉण्डींग आपल्याला शोमध्ये पाहायला मिळाली होती. कधी सलमान त्याला टोमणे मारायचा तर कधी विनोद करायचा. दरम्यान, सलमान खानने सिद्धार्थच्या निधनावर ट्विट केले. या ट्वीटमध्ये “खूप लवकर गेलास सिद्धार्थ. तुझी आठवण येत राहील. कुटुंबाप्रती माझी संवेदना. आत्म्यास शांती लाभो,” असे कॅप्शन सलमानने दिले आहे.

सिद्धार्थ शुक्लाला टीव्ही सीरियल बालिका वौधमधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो दिल से दिल तक या मालिकेतही दिसला. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बिग बॉस १३ मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्यांच्या जोडीला चांगलीच पसंत मिळाली होती. दोघेही अलीकडेच बिग बॉस OTT मध्ये दिसले होते. याशिवाय सिद्धार्थ शुक्लाने फियर फॅक्टर-खतरों के खिलाडी सीझन ७ मध्ये दिसला होता. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट होस्ट केले होते. त्याची ब्रोकन हार्ट बट ब्यूटीफुल ही वेब सिरिज चांगलीच चर्चेत होती.

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट

सिद्धार्थ शुक्लाने २४ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. आपला एक फोटो शेअर करत त्याने सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते. सिद्धार्थ शुक्लाने लिहिले होते, “सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणे सोपे नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो.”