बिहार पोलिसांनी गुरुवारी तीन विविध बँकांकडे अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या खात्यातील व्यवहारांची माहिती मागितली. तसेच सुशांतच्या बहिणीसह आचाऱ्याचाही जबाब नोंदवला. हे पथक अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरीही धडकले. मात्र ती किंवा तिचे कुटुंबीय घरी उपस्थित नसल्याचे समजते.

सुशांतचे वडील के . के . सिंह यांच्या तक्रारीवरून पाटण्याच्या राजीवनगर पोलीस ठाण्यात रियासह अन्य सहा व्यक्तींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, चोरी, विश्वासघात आदी कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्य़ाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे पथक तीन दिवसांपासून मुंबईत आहे. या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी के लेल्या आरोपांची शहानिशा सुरू असल्याचे या पथकाकडून सांगण्यात आले.

सुशांतचे तीन बँकांमध्ये खाते असून संबंधित शाखांना गुरुवारी या पथकाने भेट दिली. खाते उघडण्यात आल्यापासून आतापर्यंतच्या व्यवहारांची माहिती पथकाने मागितली आहे. बिहार पोलिसांच्या पथकाने सुशांतची मुंबईत वास्तव्यास असलेली बहीण मितू सिंग यांचा आणि सुशांतच्या वांद्रे येथील निवासस्थानाच्या आचाऱ्याचा जबाब नोंदवला. रियाकडे चौकशी करण्यासाठी हे पथक तिच्या निवासस्थानी गेले होते. मात्र रिया किंवा तिच्या कुटुंबीयांपैकी कोणीच तेथे नसल्याने पथकाला माघारी फिरावे लागले.

बुधवारी रियाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेद्वारे पाटण्यात दाखल गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर अंतिम सुनावणी होईपर्यंत मुंबई पोलिसांनी सुशांतशी संबंधित व्यक्तींकडे चौकशी न करण्याचा निर्णय घेतला.

सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही बिहार पोलिसांनी चौकशी के ल्याचे समजते. रियाविरोधात गुन्हा नोंद होताच अंकिताने समाजमाध्यमांवरून ‘ट्रथ विन्स’ असा संदेश प्रसिद्ध केला होता.

वडिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट

रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर कुठलाही आदेश देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकण्यासाठी सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. रियाने बुधवारी सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याला पूर्वसूचना दिल्याशिवाय याप्रकरणी न्यायालयाने काही कार्यवाही करू नये, असे सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी वकील नितीन सलुजा यांच्यामार्फत दाखल केलेल्या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे.

रियाविरुद्धच्या एफआयआरची ‘ईडी’कडून मागणी

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाला मनी लाँडिरगची किनार आहे काय, याचा तपास करता यावा म्हणून याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची प्रत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बिहार पोलिसांना मागितली आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) तपास करण्याबाबत ईडी विचार करत असल्यामुळे, या यंत्रणेने या संबंधात बिहार पोलिसांना पत्र लिहिले असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. रियाने सुशांतच्या पैशांचा गैरवापर केला आणि त्याची बँक खाती चुकीच्या पद्धतीने हाताळली, या आरोपांच्या तपासात ईडीला स्वारस्य आहे.