निर्माता आदित्य चोप्रा यांचा भाऊ आणि अभिनेता उदय चोप्राने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर आत्महत्येबद्दल लिहिले आणि काही वेळानंतर तो ट्विट डिलीट केला. स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असून मी ठीक नाही असंदेखील त्याने या ट्विटमध्ये कबुल केलं होतं. गेल्या सहा वर्षांपासून त्याला काम मिळत नसल्याने उदय नैराश्यग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे.

‘मी माझं ट्विटर अकाऊंट काही तासांसाठी डिअॅक्टिव्हेट करत आहे. मी मरणार असं मला वाटलं. माझ्यामते आत्महत्या एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच हा पर्याय स्वीकारू शकतो,’ असं त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं. ‘मी ठीक नाही हे मी कबुल करतो. मी सावरण्याचा खूप प्रयत्न करतोय पण त्यात यश मिळत नाहीये,’ असंदेखील त्याने म्हटलं होतं. काही तासांनंतर उदयने हे दोन्ही ट्विट डिलीट केले. त्यानंतर आपण सहीसलामत असल्याचा खुलासा केला. ‘माझ्या ट्विटमुळे काही लोक चिंतीत झाले. पण मी ठीक आहे. तो एक प्रकारचा विनोद होता, ज्याचा लोकांना गैरसमज झाला. तुमच्या प्रेमासाठी आभार,’ असं ट्विट त्याने नंतर केलं.

उदयने २००० साली ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं. ‘धूम’च्या सिक्वलमध्येही तो झळकला होता.