देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या रोगावर अद्याप औषध सापडलं नसल्यामुळे जगभरातील देशांमधील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या काळात करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. तरीही समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आपलं कर्तव्य ओळखून सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत करत आहेत. बॉलिवूड अभिनेचा वरुण धवननेही या लढ्यात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

वरुणने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरुणने ही घोषणा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही वरुणने व्यक्त केला.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मेहनत करत आहेत. या काळात वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे…त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.