22 November 2019

News Flash

फ्लॅशबॅक : अभिनेता विजय आनंद…

विजय आनंदची अभिनेता म्हणूनही वाटचाल दुर्लक्षित करण्यासारखी निश्चित नाही.

विजय आनंद

दिलीप ठाकूर
शीर्षक वाचून गोल्डी अर्थात विजय आनंदचे निस्सीम चाहते फारसे आश्चर्यचकित होणार नाहीत, पण ज्याना विजय आनंद फक्त दिग्दर्शक म्हणूनच माहित आहे त्यांना कदाचित त्याची अभिनेता म्हणून वाटचाल माहित नसावी. विजय आनंद हा अभिनेता, पटकथाकार, संकलक, निर्माता आणि दिग्दर्शक असा बहुरूपी होता. पण तो जास्त ओळखला जातो तो ‘तिसरी मंझिल’, ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’ अशा क्लासिक चित्रपटांचा असामान्य दिग्दर्शक म्हणून! अभिनेता म्हणूनही गोल्डीचे काही चित्रपट विशेष उल्लेखनीय.

त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘काला बाजार’ (१९६०) मध्ये देव आनंद नायक होता, तर विजय आनंद सहभूमिकेत होता. नंतरची त्याची अभिनेता म्हणून वाटचाल सांगायची तर, त्याचा सख्खा भाऊ चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकिकत’ (१९६४) पासून ते चेतन आनंदचाच पुत्र केतन आनंदच्या ‘हम रहे ना हम’ (१९८४) पर्यंत अनेक चित्रपट आहेत (सोबतचे छायाचित्र याच चित्रपटाचे).

त्यात विशेष उल्लेखनीय ‘कोरा कागज’ (जया भादुरी त्याची नायिका होती), ‘डबल क्रॉस’ (यात दुहेरी भूमिकेत. आणि रेखा व आशा सचदेव या दोन्ही ग्लॅमरस रुपात), ‘घुंगरू की आवाज’ (रामसे बंधूंच्या चित्रपटात गोल्डी असा कमालीचा दुर्मिळ योग. नायिका रेखा), ‘चोर चोर’ (हा गीतविरहित चित्रपट होता, गोल्डी कायमच गाण्याच्या अर्थपूर्ण टेकिंगसाठी ओळखला गेला, पण त्याचा सहाय्यक दिग्दर्शक प्रेम प्रकाश स्वतंत्रपणे दिग्दर्शक झाला तेव्हाच नेमका संगीत वादकांचा संप झाला आणि गाणी रेकॉर्ड होऊ शकली नाहीत. यात लीना चंदावरकर नायिका होती.)

इतरही काही चित्रपटात गोल्डीने भूमिका केल्यात, पण एक चित्रपट अगदी वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण, तो चित्रपट म्हणजे राज खोसला दिग्दर्शित ‘मै तुलसी तेरे आंगन की’. नूतन आणि आशा पारेख या मातब्बर अभिनेत्रींसोबत गोल्डी. आणि विशेष म्हणजे राज खोसला आणि विजय आनंद हे समकालीन गुणी दिग्दर्शक येथे मात्र वेगळ्या नात्याने एकत्र. विजय आनंदची अभिनेता म्हणूनही वाटचाल दुर्लक्षित करण्यासारखी निश्चित नाही ना?

First Published on August 3, 2018 1:05 am

Web Title: actor vijay anand
Just Now!
X