अभिनेता विवेक ओबेरॉयने एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नाही हे गंमतीशीरपणे सांगणाऱ्या एका मीम्सचा फोटो शेअर केल्यापासून त्याच्यावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे. राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य व केंद्रीय महिला आयोगानेदेखील त्याला नोटीस पाठविली आहे. मात्र ‘माझी चूक दाखवा मी माफी मागेन’ अशी भूमिका सध्या विवेकने घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची ही भूमिका पाहून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीदेखील सोशल मीडियावर त्याला खडेबोल सुनावले आहेत.

विवेकने सोशल मीडियावर सलमान खान, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या मिम्सचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन अनेक चर्चा रंगल्या. अनेकांनी त्याला माफीदेखील मागायला सांगितली. परंतु ‘लोक मला माफी मागायला सांगत आहेत. माफी मागण्यात मला कोणतीही अडचण नाही. मात्र माझं नक्की कुठे चुकलं हे तरी सांगा. जर मी चुकलो असेल तर नक्कीच माफी मागेन’, अशी प्रतिक्रिया विवेकने या मीम्सवरती दिली. त्याचं हे उत्तर पाहून उर्मिला मातोंडकर यांनीदेखील संताप व्यक्त केला.

“अत्यंत लाजीरवाणे! विवेक ही पोस्ट अत्यंत चुकीची आहे. हा योग्य मार्ग नाही. जर तुम्ही खरंच त्या महिलेची आणि लहान मुलीची माफी मागू शकत नसाल, तर निदान ती पोस्ट डिलीट करण्याची सभ्यता तरी दाखवा”, असं ट्विट करत उर्मिला यांनी विवेकला खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, विवेकने केलेल्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राजकीय व्यक्तींपासून कलाविश्वापर्यंत सारेच त्याच्यावर संताप व्यक्त करत आहेत. अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील त्याला क्लासलेस म्हटलं होतं. मात्र सोनमच्या या प्रतिक्रियेवर त्याने तिला सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.