नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने बंगळुरुतील निवासस्थानी निधन झाले. गिरीश कर्नाड यांच्या संस्कार या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटाची निर्मिती आणि वाद याबाबत २०१३ मध्ये ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कर्नाड यांनी भाष्य केले होते.

गिरीश कर्नाड यांच्या संस्कार या चित्रपटाने त्याकाळी सर्वांचीच दाद मिळवली होती. हा चित्रपट यू. आर. अनंतमूर्ती यांच्या ‘संस्कार’ या कादंबरीवर आधारित होता. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर चित्रपट झाला पाहिजे, असं गिरीश कर्नाड आणि त्यांच्या २० मित्रांनी ठरवलं होते. त्यांनी स्वत:चे पैसे घालून तो चित्रपट ९५ हजार रुपयांत पूर्ण केला होता. त्यावेळी कर्नाड हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये संपादक होते. या चित्रपटासाठी ऑक्सफर्डनं दिलेली गाडीच चित्रपटाच्या प्रॉडक्शनसाठी वापरल्याचे कर्नाड यांनी सांगितले होते. ‘मद्रास ग्रूप’ हे कर्नाड यांच्या चित्रपटसंस्थेचं अनौपचारिक नाव होते.

संस्कार चित्रपट आणि वाद
ग्रामीण जीवनाचं चित्रण संस्कार या कादंबरीत होते. एका व्यसनी आणि समाजाच्या मते अनैतिक वर्तन करणाऱ्या इसमाच्या मृत्यूनंतर, तो ब्राह्मण होता म्हणून त्याच्यावर ब्राह्मणांच्या पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत की नाही, या प्रश्नावरून अख्खं गावच दुभंगलं जातं, असं ते कथानक होते. कर्नाड यांच्या चित्रपटावर सरकारनं बंदी घातली होती. चित्रपट ब्राह्मणविरोधी असल्याचा दावा केला जात होता. तर या कादंबरीचे लेखक ब्राह्मण, चित्रपटाचा निर्माता ब्राह्मण, दिग्दर्शक (कर्नाड) तोही ब्राह्मणच आणि या चित्रपटाशी संबंधित असलेले एकंदर १२ जण ब्राह्मण. मग आम्ही कशाला ब्राह्मणविरोधी प्रचार करू, असा प्रतिवाद कर्नाड आणि अन्य मंडळींकडून केला जात होता. या वादामुळे चित्रपटाची चर्चा देखील झाली. इतकंच नव्हे बंदी उठवल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला होता.

‘संस्कार’मुळेच कर्नाड अभिनय क्षेत्रात
संस्कार चित्रपटातला कर्नाड यांचा अभिनय श्याम बेनेगल यांनी पाहिला होता आणि यानंतर बेनेगल यांनी ‘निशांत’ मध्ये कर्नाड यांना भूमिका दिली. इथूनच कर्नाड यांचा हिंदी चित्रपटांमधील अभिनयाचं करिअर सुरू झालं होतं.