लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन राजकारणात प्रवेश करण्याचे धाडस दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी केले, तसाच प्रयत्न बॉलीवूडमध्येही कित्येक कलाकारांनी केला. या वर्षी तर लोकसभेत पंधरा खासदार असे आहेत जे चित्रपट, टेलीव्हिजन क्षेत्राशी जोडलेले आहेत. राजकारणाचा रंग लावून घेतलेल्या कलावंतांचा हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा समजला जातो. मात्र दाक्षिणात्य कलावंत वगळता राजकारणाची धुळवड आपल्या अंगावर घेऊन खेळ रंगवणे बॉलीवूडच काय मराठी चित्रपट कलावंतांनाही साध्य झालेले नाही.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केवळ राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली नाही, तर स्वत:ची पार्टी स्थापन करण्याचा विचारही बोलून दाखवला आहे, तर दुसरीकडे अभिनेता, दिग्दर्शक कमल हासन यांनी आपला राजकीय पक्षही याच आठवडय़ात स्थापन करत कारकीर्दीचा नवा अध्याय सुरू केला आहे. या दोन प्रस्थापित कलावंतांच्या राजकीय प्रवेशामुळे दक्षिणेत खळबळ माजली असली तरी त्याचे वारे देशभर पोहोचले आहेत. या दोघांच्याही राजकीय प्रवेशाला सध्या ‘स्टार वॉर’चे स्वरूप दिले जात आहे. ते किती खरे, किती खोटे हे लवकरच कळेल, मात्र त्या अनुषंगाने एकंदरीतच कलावंतांची राजकारणात शिरण्यामागची धारणा, त्यांना आलेले यश-अपयश हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल..

दाक्षिणात्य कलाकारांचा राजकारणावरचा प्रभाव, त्यांना मिळणारा लोकांचा पाठिंबा हे गणितच वेगळे आहे. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी तिथे राजकारणाचा रंग अंगाला लावून घेतला ते ते राजकारणात रमले, प्रस्थापित झाले. असे असताना रजनीकांत आणि कमल हासन या दोघांच्या राजकीय प्रवेशाला छुपा विरोध का होतो आहे? त्यावरून एवढा गदारोळ का केला जातो आहे? या प्रश्नाचे उत्तरही या प्रस्थापितांकडेच आहे. अनेकदा कलाकार हे प्रस्थापित पक्षांपैकी कोणत्या तरी पक्षाचा आधार घेऊन राजकारणात प्रवेश करतात. हिंदूीत जशी ही प्रथा चित्रपटांप्रमाणेच कपूर खानदानापासून सुरू होते. पृथ्वीराज कपूर १९५२ ते ६० या काळात राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीत एकदा लोकप्रियता मिळाली की त्या कलावंतांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक राजकीय पक्षांकडून केला जातो. त्यामुळे दिलीपकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन हे हिंदीतले सुपरस्टार राजकारणापासून वेगळे राहिले असते तरच नवल! कलावंतांची लोकप्रियता आणि त्यांचे चाहते ही मतपेटी आपल्याकडे खेचून घेण्याची अहमहमिका राजकीय पक्षांकडे असते. त्यातही आपल्याकडे दोनच मोठे पक्ष असल्याने एक तर भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस या दोन पक्षांबरोबर राहिलेल्या कलाकारांची संख्या तुलनेने जास्त आहे. राजेश खन्ना काँग्रेसचे नवी दिल्लीतील खासदार होते, तर अमिताभ बच्चन हे अलाहाबादमधून काँग्रेसचे खासदार होते. अर्थात, बोफोर्स प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांचा राजकारणाचा अंक तिथेच संपला. त्यानंतर कित्येक वर्षांनी जया बच्चन समाजवादी पक्षाशी जोडल्या गेल्या त्या आजतागायत.. मात्र प्रथितयश म्हणवल्या जाणाऱ्या या कलाकारांपैकी कोणीही राजकीय पक्ष काढण्याचा विचार कधीच केला नाही. राजकीय पक्ष काढण्याचा प्रयत्न हिंदीत फक्त देव आनंद यांनीच केला, अशी माहिती ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी दिली. आणीबाणी संपल्यानंतर १९७७ साली देव आनंद यांनी ‘नॅशनल पार्टी’ नावाने पक्ष सुरू केला होता. त्यामागेही एक घटना होती, असे ठाकूर सांगतात. ‘देस परदेस’ या चित्रपटाच्या कथेतच इंग्लंडची पाश्र्वभूमी होती, मात्र आणीबाणी असल्याकारणाने परदेशात चित्रीकरणाची परवानगी नाकारण्यात आली. त्या वेळी टी. के. देसाई यांनी मुंबईतच देव आनंद यांना इंग्लंडचा सेट उभा करून दिला आणि चित्रीकरण करण्यात आले, पण तो सल देव आनंद यांच्या मनात कायम होता. अखेर त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. शिवाजी पार्कमध्ये त्यांनी पहिली सभा घेत पक्षाची घोषणा केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री टीना मुनीम, सिंपल कपाडिया आणि दिग्दर्शक यश जोहर अशी मंडळी होती. यश जोहर हे त्या वेळी देव आनंद यांच्या नवकेतनमध्येच कार्यरत होते, त्यामुळे तेही या कार्यात सहभागी झाले; पण देव आनंदनी उत्साहाच्या भरात ज्या गोष्टी सुरू केल्या आणि संपवल्या त्यातलीच ही पक्षाची गोष्ट होती. त्यामुळे काही दिवसांतच त्या पक्षाचा निकाल लागला, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

दक्षिणेत मात्र कलाकारांनी आपापले पक्ष स्थापन केले आणि त्यात त्यांना यशही मिळाले हेच इतिहास सांगतो. सी. एन. अन्नादोराई यांनी १९४९ साली ‘द्रविड मुन्नेत्र क ळघम’ (डीएमके) हा पक्ष स्थापन केला. आजही तो तिथला प्रस्थापित पक्ष आहे. १९७२ साली अभिनेता एम. जी. रामचंद्रन यांनी द्रविड मुन्नेत्र कळघममधून बाहेर पडत ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम’ची स्थापना केली. १९८८ मध्ये शिवाजी गणेशन यांनीही पक्षस्थापनेचा प्रयत्न केला, मात्र वर्षभरातच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्याहीआधी आंध्र प्रदेशात १९८२ साली एन. टी. रामाराव यांनी ‘तेलुगू देसम पार्टी’ हा पक्ष सुरू केला. आत्ताच्या काळात विजयकांत यांनी २००५ साली पक्ष स्थापन केला होता, तर २००८ साली अभिनेता चिरंजीवीनेही प्रजा राज्यम पार्टी हा आपला पक्ष काढला होता, मात्र त्याचा पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आजही हे पक्ष प्रस्थापित आहेत. त्यामुळेच पुन्हा दोन सुपरस्टार कलाकारांचे स्वत:चे पक्ष येणार या विचाराने तिथे राजकीय वातावरणात वादळ निर्माण केले आहे.

कलावंत आणि त्यांची राजकीय निष्ठा हाही कायम चर्चेचा विषय राहिला आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात बलराज साहनींसारखा अभिनेता कम्युनिस्ट विचारांनी भारलेला होता, कैफी आझमीही कम्युनिस्ट पक्षात होते. मराठीतही निळू फुले, राम नगरकर हे समाजवादी पक्षाशी जोडलेले होते. दादा कोंडकेही राजकीय पक्षाशी जोडले गेले होते. मात्र मराठीत कोणीच फार काळ राजकारणात सक्रिय राहिलेले नाही. मच्छिंद्र कांबळी यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. रमेश देव यांनीही कोल्हापूरमधून निवडणूक लढवली. महेश मांजरेकर यांनीही मनसेकडून निवडणूक लढवली. आता डॉ. अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, नितीन देसाई अशी मंडळी शिवसेनेत कार्यरत आहेत. हिंदीतही अनेक कलाकार भाजप आणि कॉँग्रेसमधून कार्यरत आहेत. मात्र नव्या कलाकारांपैकी कोणी अमुक एक पक्षाशी बांधील आहे, असे चित्र बॉलीवूडनेही पाहिलेले नाही. त्यामुळे राजकीय धुळवडीत उतरायचे, जमेल तेवढा आनंद घ्यायचा, मात्र हा रंग नट म्हणून लागलेल्या रंगापेक्षा मोठा होणार नाही, याची काळजी घेतच कलांवतांनी आजवर राजकीय प्रवास केल्याचे दिसून येते. दक्षिणेत कमल हासन आणि रजनीकांत यांच्या प्रवेशाने काही गणिते बदलली तर कदाचित येत्या काळात त्याचा काहीएक प्रभाव बॉलीवूडवरही पाहायला मिळेल..