कंगान रणौत ही आताच्या घडीला बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाते. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेक मानापमान, यश- अपशय पचवत खस्ता खात ती आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत विराजमान झाली आहे. या प्रवासातील कटू अनुभवांना कंगाननं पुन्हा एकदा ‘मणिकर्णिका’च्या प्रमोशनदरम्यान उजाळा दिला आहे. कोणे काळी काही गर्विष्ठ  अभिनेते त्यांच्या अंहकारापोटी मला सेटवर सहा- सहा तास वाट पाहायला लावायचे, तोही एक प्रकारचा छळच होता असं कंगना म्हणाली.

‘या क्षेत्रात फक्त लैंगिक छळ होतो असं नाही. अनेक बाबतीत महिलांची छळवणूक होते. माझा लैंगिक छळ झाला असं मी म्हणणार नाही पण काही लोकांना अहंकार होता आणि या अहंकारापोटीच काहींनी माझा मानसिक छळही केला. काही अभिनेत्यांनी मला सेटवर सहा सहा तास वाट पाहायला लावली होती. चुकीचा वेळ सांगून मला डबिंगसाठी बोलावलं जायचं. तासन् तास वाट पाहिल्यानंतर शूट किंवा डबिंग रद्द केलं जायचं. काही वेळा माझ्या व्यतिरिक्त डबिंगसाठी अन्य कोणालातरी बोलावलं जायचं. असं वागणं एका कलाकाराच्या हक्काचं उल्लंघन केल्यासारखंच होतं मात्र हे सर्रार चालायचं’ असं म्हणत कंगनानं याचा वाईट अनुभव पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितला.

काहीजण माझ्याविरोधात एकत्र येतात, मला चित्रपटातील इव्हेंटमध्ये आमंत्रण देणं टाळलं जातं, कित्येकदा ट्रेलर लाँचिग सोहळेही माझ्याशिवायच पार पडतात असाही आरोप तिनं केला.