News Flash

नायिकांची पठडी आणि निर्मात्यांचा गोंधळ

घराच्या चार भिंतींतून बाहेर पडून स्वत:च्या वाटा धुंडळायला निघालेल्या प्रत्येक स्त्रीला कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झगडा हा द्यावाच लागला आहे.

| March 8, 2015 07:30 am

घराच्या चार भिंतींतून बाहेर पडून स्वत:च्या वाटा धुंडळायला निघालेल्या प्रत्येक स्त्रीला कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झगडा हा द्यावाच लागला आहे. पण, एक क्षेत्र असं आहे जिथे महिलांचं वर्चस्व सर्वानी बिनशर्त मान्य केलं. ते म्हणजे टीव्ही. चित्रपट, नाटक, जाहिरात अशा विविध माध्यमांवर जिथे rv05अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव आहे तिथे टीव्हीवर मात्र गेली कित्येक दशकं  स्त्रियांनी एकहाती सत्ता गाजवली आहे. दूरदर्शनच्या ‘हमलोग’, ‘मालगुडी डेज’, ‘महाभारत’, ‘रामायण’चे दिवस संपवत एकता कपूरने ‘क्यँुकी साँस भी कभी बहू थी’ या मालिकेपासून ‘क’च्या अविरत चालू राहणाऱ्या बाराखडीला सुरवात केली तेव्हापासून टीव्हीवर स्त्रीप्रधान मालिकांनीच सत्ता गाजवली आहे. एकीकडे ‘जागतिक महिला दिन’ साजरा करत असताना घराघरातील महिलावर्गाला ताब्यात ठेवणाऱ्या मालिकांचे निर्माते-दिग्दर्शक आजही आपल्या कथानकातील स्त्री-प्रतिमांबाबत गोंधळलेलेच दिसतात.
 एकता कपूरने सुरवातीपासूनच नेमका प्रेक्षकवर्ग आणि त्याला आवडणारे विषय अचूकपणे टिपत त्या प्रकारच्या मालिकांच्या निर्मितीचा सपाटाच सुरू केला. संध्याकाळी सात वाजल्यानंतर हातातली सर्व कामे संपावून मोकळ्या बसणाऱ्या घराघरातील महिलावर्गाला तिने लक्ष्य केले. दोन स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांच्यामध्ये सासू, जावा, नणंदा यांच्यावरून होणऱ्या चर्चा, त्यांतून त्यांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येकीची स्वतंत्र अशी व्यूहरचना हा तिच्या मालिकांचा मुख्य विषय. अर्थात आपल्याकडे आदर्श, गृहकर्तव्यदक्ष, प्रेमळ, सुसंस्कारी सुनेचे आकर्षण फार आहे. हीच सून तिच्या मालिकांची ओळख झाली आणि तिच्या अगदी विरुद्ध म्हणजे सतत काही तरी कुरापती काढणारी, वाद-भांडणे लावणारी स्त्री खलनायिका झाली. या एका सूत्रावर तिने कित्येक मालिका यशस्वी करून दाखविल्या. अर्थात काळ बदलत जातो त्यानुसार लोकांचे विचार, त्यांची मते बदलत जातात आणि काळानुसार ते साहजिकच आहे. पण, या मालिकांच्या बाबतीत मात्र हे सूत्र लागू झाले नाही. अजूनही छोटय़ा पडद्यावरची सून चाकोरीच्या सूत्रामध्येच अडकून पडलेली दिसून येते. ती आता शिकलेली, मोठय़ा हुद्दय़ावर काम करताना दाखवली जाते. पण, ‘चूल आणि मूल’ हे समीकरण तिच्या हातातून सुटायला तयार नाही. यामध्ये अजूनही मालिकांचे निर्माते एका ठरावीक पठडीच्या बाहेर आपल्या नायिकेला घेऊन जाताना काहीसे गोंधळलेले दिसून येत आहेत. त्यामुळे मालिकेचा विषय कितीही चांगला असला, तरी ठरावीक भागांनंतर मालिकांमधील नायिकांची परिस्थिती ‘जैसे थे’ असते.
साक्षी तन्वर आणि राम कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेली ‘बडे अच्छे लगते है’ सुरुवातीला चाळिशीत लग्नाच्या बेडीत अडकलेल्या दोघांच्या आयुष्याभोवती फिरत होती. उशिरा लग्न झाल्यामुळे त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्या, त्यांना तोंड देत त्यांचे फुललेले नाते हा मालिकेचा विषय होता. पण, नंतर मात्र राम कपूरला चित्रीकरणाला मिळणारा अपुरा वेळ, त्यात पुन्हा खलनायिका सावत्र सासू आणि तिचा मुलगा यांच्या कुरापती यांमध्ये साक्षीची व्यक्तिरेखा पुन्हा घरात अडकली गेली. ‘दिया और बाती’मध्ये संध्या आयपीएस बनल्यानंतर पुढे काय?, या प्रश्नाचे उत्तर निर्मात्यांना भाभोच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा, मूल जन्माला घालण्याची घाई यामध्ये सापडले आणि संध्या पुन्हा घराच्या चार भिंतींमध्ये अडकली गेली. सरकारी नोकरी करणारी सून म्हणजे ‘धनाची पेटी’ असे समजणारा एक वर्ग सध्या भारतात दिसून येतो, या वर्गाची लग्नात हुंडा घेण्याऐवजी दरमहा सुनेच्या पगारावर नजर असते. या वर्गाचे चित्रण करणारी ‘सर्विसवाली बहू’ ही नवी मालिका सध्या ‘झी टीव्ही’वर सुरू झाली आहे. पण, त्याची व्यथाही काही वेगळी नाही. बिहारमधील परंपरागत घराभोवती फिरणारी मालिका असल्यामुळे सुरुवातीपासूनच आईची मुलीच्या नोकरीला असलेली नापसंती, श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा याच वळणावर मालिका चालू आहे. त्यामुळे लवकरच ही सर्विसवाली बहूसुद्धा घरातल्या राजकारणातच अडकेल असे चित्र दिसू लागले आहे. ‘हॅलो प्रतिभा’मध्येसुद्धा प्रतिभाला नक्की काय हवयं आणि त्यासाठी ती कसा लढा देणार आहे याचा नेमका अंदाज निर्माता-दिग्दर्शकाला येताना दिसत नाही आहे. त्यामुळे मालिका सध्या तरी प्रतिभाच्या सासरच्यांच्या रुसव्याफुगव्यांवर चालली आहे. ‘बालिकावधू’ची वाटचाल बालविवाह झालेल्या मुलीच्या आयुष्याची होणारी फरफट इथपासून झाली होती. पण, आता त्याच वळणावरची ‘गंगा’ ही मालिका टीव्हीवर आली आहे. यामध्ये बालविवाहच पण लहानपणीच विधवा झालेल्या मुलीची कथा सांगण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांची निर्मिती संस्था ‘स्पेअर ओरिजिन’चं आहे. त्यामुळे परत त्याच वळणावरची मालिका बनविण्याचा अट्टहास निर्मात्यांना का करावासा वाटला हा मुख्य प्रश्न आहे. कोवळ्या वयात मुलींवर येणारी संकटे आणि त्यातून सुटण्याची त्यांची धडपड हा सध्या टीव्हीचा लाडका विषय झाला आहे. त्यातलेच हे एक पाऊल म्हणावे लागेल. हत्ती आणि मुलीच्या मैत्रीवर आधारित ‘बंधन’ मालिकाही काही काळानंतर कथेच्या अभावी भरकटत गेली. पण लहान मुलांमुळे मालिकेला मिळणारा कनवाळू दृष्टिकोन आणि पुढे भाग वाढविण्यासाठी मालिका पुढे ढकलण्याची संधी निर्मात्यांना हवीहवीशी वाटते.
त्यात सध्या तरी निर्मात्यांसाठी भारतातील राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली या भागांमध्ये राहणारा प्रेक्षकवर्ग महत्त्वाचा आहे. त्यांचे सण, परंपरा, रीतिरिवाज याचे चित्रण छोटय़ा पडद्यावर केल्यास त्याला हमखास यशाची खात्री मिळत असल्याचे चित्र सध्या तरी आहे. तसेच गावागावातला अर्धशिक्षित वर्गही आता टीव्हीकडे वळू लागला आहे. त्या वर्गाला अजूनही कौटुंबिक कलहावर आधारित मालिका आकर्षित करत आहेत. त्यामुळे परत फिरून मालिका त्याच वळणार येताना दिसतात. पण, असे असतानाही एका बाजूला एव्हरेस्टवर चढण्याचा ध्यास घेणाऱ्या अंजलीची ‘एव्हरेस्ट’ मालिका, सासरच्यांच्या विरोधात जाऊनही सत्याची कास धरणारी ‘प्रतिज्ञा’ अशा कित्येक मालिकाही प्रेक्षकांना आवडल्या होत्या, त्याकडे निर्माते सहजपणे दुर्लक्ष करत आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 7:30 am

Web Title: actress and producers
Next Stories
1 कानामागून आला..
2 बटबटीत!
3 ‘एमएच ०२ डीएल ५२६२’ शरीरधर्माची असह्य़ घुसमट
Just Now!
X