मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘भाऊबंदकी’ या नाटकात त्यांना ‘आनंदीबाई’ साकारायची संधी मिळाली. हे नाटक नव्याने पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होणार होते. अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांनी साकारलेली ‘आनंदीबाई’ करायची संधी त्यांना मिळाली. मा. दत्ताराम, मामा पेंडसे, दाजी भाटवडेकर अशी दिग्गज मंडळी नाटकात होती. साहित्य संघातील तो प्रयोग पार पडला. नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक त्या प्रयोगाला आले होते. प्रयोगानंतर ते आत कलाकारांना भेटायला आले. ‘आनंदीबाई’चे काम करणाऱ्या त्या अभिनेत्रीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना ते म्हणाले, ‘‘आजच्या प्रयोगात मी ‘राघोबादादा’ नाही याचे मला वाईट वाटते..’’

नानासाहेब फाटक यांच्याकडून कौतुकाची व शाबासकीची थाप मिळविणाऱ्या त्या ज्येष्ठ  अभिनेत्री आशालता वाबगावकर आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘पुनर्भेट’ सदर सुरू झाले तेव्हापासून आजवर पडद्याआड असलेल्या २४ दिग्गजांना ‘रविवार वृत्तांत’ने बोलतं केलं. आजचा सदराचा पंचविसावा खास भाग हा आशालता यांच्याशी मारलेल्या गप्पांनी रंगला आहे.

Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल

खरे तर ही भूमिका याआधी दुर्गाबाई खोटे यांनी साकारली होती. पण त्यांच्या भूमिकेची कोणतीही छाप न ठेवता किंवा अनुकरण न करता आशालता यांनी आपल्या खास शैलीत ही ‘आनंदीबाई’ साकारली. आशालता यांच्या बाबतीत असा योग (म्हणजे अगोदर अन्य अभिनेत्रींनी केलेली भूमिका काही प्रयोगांनंतर त्यांच्या वाटय़ाला आल्याची उदाहरणे) बरेचदा आला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात सुधा करमरकर यांनी साकारलेली ‘येसुबाई’, ‘गारंबीचा बापू’मधील उषा किरण यांनी साकारलेली ‘राधा’, ‘गुंतता हृदय हे’मधील पद्मा चव्हाण यांनी साकारलेली ‘कल्याणी’ अशा भूमिका आशालता यांनी साकारल्या. त्याबाबत आशालता म्हणाल्या, ‘‘एखाद्या अभिनेत्रीने साकारलेली भूमिका नंतर पुन्हा त्याच नाटकात साकारणे हे एक आव्हान असते. कारण प्रेक्षकांच्या मनात त्या कलाकाराने केलेली भूमिका ठसलेली असते. तो प्रभाव पुसून टाकून आपली स्वतंत्र प्रतिमा नव्याने भूमिका करणाऱ्या कलाकाराला निर्माण करावी लागते. मी त्याबाबतीत नक्कीच सुदैवी आहे. कारण माझी तुलना कोणाबरोबरही झाली नाही आणि मी केलेल्या भूमिकांचे कौतुकच झाले. अर्थात याचे श्रेय त्या त्या नाटकाच्या दिग्दर्शकांनाही आहेच. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून केलेली माझी निवड व त्यांचे मार्गदर्शन यामुळे ते आव्हान मला पार पाडता आले.’’

आशालता यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी’ महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एमए’ केले आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. त्या आठवणींच्या स्मरणरंजनाचा गोफ उलगडताना त्यांनी सांगितले, आमच्या घरी नाटय़, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. शिक्षण महत्त्वाचे, ते आधी पूर्ण कर आणि मग तुला नाटक-गाणे वगैरे काय करायचे ते कर अशी आई-वडिलांची भूमिका होती. त्यामुळे सुरुवातीला नाटकातून काम वगैरे काहीही केलेले नव्हते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असतानाच ती संधी मिळाली. ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ने राज्य नाटय़ स्पर्धेसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक बसवले होते. पं. अभिषेकी यांनी माझे नाव सुचवले. गोपीनाथ सावकार यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्या नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. स्पर्धेत नाटकाला सवरेत्कृष्ट नाटक आणि मला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पुढे ‘धी गोवा’चीच ‘संगीत शारदा’ आणि ‘संगीत मृच्छकटीक’ ही दोन नाटके राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केली. याही दोन्ही नाटकांत मला अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले. हे सगळे करत असतानाही पूर्णवेळ नाटक, अभिनय करायचे असे काहीही ठरविलेले नव्हते. पण नाटकाचे वाचन, त्यातील बारकावे, आपल्यासह अन्य कलाकारांच्या भूमिका किंवा ती पात्रे जिवंत होताना पाहणे यात काहीतरी वेगळेपण आहे, असे मला जाणवत गेले. ती प्रक्रिया मला आवडली आणि मी नाटकाकडे ओढले गेले.

आशालता वाबगावकर यांच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीतील त्यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाटय़पदे गाजली. ही नाटय़पदे आजही लोकप्रिय व रसिकांच्या ओठावर आहेत. ‘मत्स्यगंधा’चा आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाटय़संगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्यात पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध भावना/ छटा मला यातून सादर करायच्या होत्या. माझ्यासाठी ते एक आव्हान होते. दिग्दर्शक मा. दत्ताराम आणि नाटकातील अन्य सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने मी ते पेलले आणि ही भूमिका साकारली. १ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. संगीत आणि नाटय़पदे हा या नाटकाचा मूळ आत्मा. पुढे काही प्रयोगांनंतर ते नाटक अधिक आटोपशीर व कमी करण्यात आले. या नाटकाने मला खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. माझी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. माझ्या आजवरच्या अभिनय प्रवासात हे नाटक महत्त्वाचे आहे.

‘मत्स्यगंधा’नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभर मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत.

मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी ‘चरित्र अभिनेत्री’ म्हणून काम केले आहे. बासू चॅटर्जी यांचा ‘अपने पराये’ हा त्यांचा पहिला चित्रपट. तो कसा मिळाला, याविषयी त्यांनी सांगितले, मुंबई दूरदर्शनवरील एका कोंकणी नाटकात मी काम केले होते. ते नाटक बासुदांच्या पाहण्यात आले. त्यानंतर त्यांनी माझे ‘गुंतता हृदय हे’ नाटकही पाहिले. आणि माझी ‘अपने पराये’साठी निवड केली. रंगभूमीवर काम केलेले असले तरी चित्रपटाची भाषा आणि तंत्र माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. शबाना आझमी यांच्याबरोबर माझे पहिले दृश्य होते. या चित्रपटाच्या निमित्ताने बासुदांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाले. ‘नमक हलाल’ चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगाची एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या, यात मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा रंगविली होती. परवीन बाबीच्या आईची भूमिका मी करत होते. आधुनिक (ज्याला मॉडर्न म्हणता येईल अशी माझी भूमिका होती) चित्रीकरणाच्या वेळी समोरून अमिताभ बच्चन आले, नमस्कार करून म्हणाले मी अमिताभ बच्चन. पाठोपाठ शशी कपूर यांनी ओळख करून दिली. अमिताभ म्हणाले, मराठी थिएटर मे आप तो ‘दादा’ है, आपकी बहोत तारीफ सुनी है’..

‘अपने पराये’नंतर आशालता यांचा हिंदीतील प्रवास सुरू झाला. ‘अंकुश’, अग्निसाक्षी’, ‘नमकहलाल’, ‘शराबी’, ‘कुली’, ‘निकाह’, ‘सद्मा’, ‘चलते चलते’, ‘जंजीर’, ‘आज की आवाज’, ‘वो सात दिन’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘मंगल पांडे’, ‘ये तो कमाल हो गया’, ‘तेरी मॉंग सितारोंसे भर दू’, ‘मरते दम तक’, ‘घायल’ ‘शौकिन’ आदी सुमारे २०० हून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तीन कोंकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील ‘महाश्वेता’, ‘पाषाणपती’ तसेच ‘जावई विकत घेणे’, ‘कुलवधु’ या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. आशालता यांच्या बाबतीत आणखी एक माहिती नसलेली गोष्ट म्हणजे कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून त्यांनी काही काळ गाणी गायली आहेत. वाद्यवृंदातील त्या मुख्य गायिका होत्या. मुकेश, हेमंतकुमार आदींबरोबर त्यांनी गाणी गायली. अभिनेत्री सुधा करमकर यांच्या ‘लिटिल थिएटर’च्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या बाल नाटय़ातील त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली. सुधा करमरकर यांच्यामुळे ती आरती गायची संधी त्यांना मिळाली. ‘चांद भरली रात आहे’, ‘चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते’, ‘राजस राजकुमारा’(नाटक-विदूषक, तीनही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘जन्म दिला मज त्यांनी’, ‘तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ (मत्स्यगंधा), ‘रवी किरणांची झारी घेऊनी’ (भावगीत) ही त्यांनी गायलेली अन्य काही गाणी.

‘अंकुश’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांनी गायलेले ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणेही लोकप्रिय आहे. त्याची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, मी जम्मू-काश्मीरला फिरायला गेले होते. बाजारात फिरताना एका दुकानात खरेदी करताना त्या दुकानदाराने मला ओळखले. तुम्ही उद्या अर्धा तास देऊ शकाल का?, म्हणून विचारणा केली. दुसऱ्या दिवशी तो मला एका शाळेत घेऊन गेला. मी शाळेत पाऊल टाकत नाही तोच ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणे तिथे सुरू झाले. त्या शाळेत ते गाणे दररोज प्रार्थना म्हणून वाजविले जात होते. शाळेत सगळ्या मुलांसमोर हे गाणे ज्यांच्यावर चित्रित झाले त्या या आहेत, अशी माझी ओळख करून दिली आणि त्या गाण्याच्या काही ओळी मी तिथल्या मुलांसमोर सादर केल्या. हा अनुभव अविस्मरणीय होता.

वयाच्या ७७ व्या वर्षांत असलेल्या आशालता यांना आजही मालिका किंवा चित्रपटात आव्हानात्मक भूमिका मिळाली तरच करायची इच्छा आहे. सध्याची चांगली मराठी नाटके, चित्रपट त्या आवर्जून पाहतात. वाचन हा त्यांचा छंद आहे. या वयातही त्या संगणक शिकल्या असून संगणकाचा तसेच ‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सध्याच्या सामाजिक माध्यमांचाही त्या वापर करतात. सतत नवीन काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आजच्या पिढीबरोबरही त्या सहज जुळवून घेतात.

पुढे काय होणार याचा विचार मी कधीही केला नाही आणि करतही नाही. जे व्हायचे असेल ते त्याच वेळेत होते आणि होणार नसेल तर कितीही व काहीही केले तरी होत नाही. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आपण स्वत: आनंद घ्यायचा आणि इतरांनाही तो वाटायचा. जे समोर येते, मिळते ते स्वीकारायचे आणि पुढे जायचे हे माझ्या जीवनाचे सूत्र असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला..

shekhar.joshi@expressindia.com