मराठी चित्रपटसृष्टीत ९० च्या दशकात अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या. या मराठमोळ्या अभिनेत्रीने नंतर एका एनआरआयशी विवाह केला.

मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी अश्विनी यांनी लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनी यांना दोन मुले आहेत आणि त्या सॅन फ्रॅन्सिस्कोला (अमेरिका) राहतात. नुकताच त्यांनी मकर संक्रांतीचा सणही अमेरिकेत साजरा केला. त्यांनी आपल्या मुलांसह पतंग उडविण्याचा आनंदही लुटला. तसेच, त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना मकर संक्रांतीच्या खूप सा-या शुभेच्छाही दिल्या आहेत.

लवकरच अश्विनी भावे या ‘ध्यानीमनी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘ध्यानीमनी’ या नाटकावर आधारित ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट १० फेब्रुवारीला येत आहे. सध्या मराठी चित्रपटांवर बॉलिवूडचं विशेष लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी मराठी चित्रपटांचं भरभरून कौतुक करत आहे. बिग बी आणि सलमान खान यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ‘ध्यानीमनी ‘या चित्रपटाच्या ट्रेलरला दाद दिली. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंटरटेन्मेंटद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हेसुद्धा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नाटककार प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कलाकार एका नव्या रुपात दिसत आहेत. अश्विनी भावे ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या वेगळ्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.