५० च्या दशकात सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री डेजी इराणी यांनी आज एक मोठा खुलासा केला आहे. बालकलाकार म्हणून त्यांची ओळख सर्वोदूर पसरली असताना त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. गेल्या ६० वर्षांपासून डेजी या त्यांच्या कलाकृतीमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आल्या आहेत. फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांची डेजी या मावशी लागतात. इतक्या वर्षानंतर डेजी यांनी हा अनुभव का सांगितला असा प्रश्न अनेकांच्या मनात येत होता. पण सध्या सिनेमे, मालिका आणि टॅलेंट शोमध्ये येणाऱ्या मुलांचे वाढते प्रमाण पाहून त्यांनी हा अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या अनुभवातून त्यांनी मुलांच्या पालकांना, गुरूंना आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुलांना जास्तीत जास्त सांभाळण्याची गरज असल्याच सांगितले आहे.

डेजी यांच्यावर बलात्कार झाला तेव्हा त्या फक्त ६ वर्षांच्या होत्या. डेजी म्हणाल्या की, ‘ज्या व्यक्तिने माझ्यावर बलात्कार केला ती व्यक्ती माझा सांभाळ करत होती. तो ‘हम पंछी एक डाल के’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तो माझ्यासोबतच असायचा. एका रात्री मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या रुममध्ये आला. मला बेल्टने मारल्यावर त्याने माझ्यावर अत्याचार केले. मला धमकीही दिली की जर मी हे कोणाला सांगितलं तर तो मला मारुन टाकेल.’

डेजी यांच्या महत्त्वकांक्षी आईने त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी जबरदस्ती सिनेसृष्टीत काम करायला सांगितले. इराणी यांनी ५० हून जास्त सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी ‘नया दौर’, ‘जागते रहो’, ‘बूट पॉलिश’ आणि ‘धूल का फूल’ या हीट सिनेमांमध्ये काम केले आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. बालकलाकार म्हणून त्या एवढ्या प्रसिद्ध होत्या की, लेखक त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच सिनेमाची कथा लिहीत होते.

डेजी यांनी अशोक कुमार, राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार, वैजयंतीमाला, मीना कुमारी यांच्यासोबत बालकलाकार म्हणून काम केले आहे. असे म्हटले जाते की, मीना कुमारी आणि डेजी यांच्यात एक फार सुंदर नाते होते. डेजी, मीना कुमारी यांना आईच मानायच्या.
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखती त्या म्हणाल्या की, ‘तो आता या जगात नाही. त्याचे प्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवालीसोबत संबंध होते. त्यामुळे साहिजीकच त्याची ओळख सिनेसृष्टीतही होती. माझ्या आईला काहीही करुन मला स्टार बनवायचे होते. मराठी सिनेमा बेबीमधून माझे पदार्पण झाले. हम पंछी एक डाल के सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नजरसोबत मी मद्रासला गेले होते.’

‘मला ती घटना फारशी आठवत नाही पण त्या जीवघेण्या वेदना आणि बेल्टचा मार आजही स्पष्ट आठवतो. ज्या रात्री बलात्कार झाल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मी अशा पद्धतीने सेटवर पोहोचले की काही झालंच नाही. त्यानंतर अनेक वर्षांत आईला माझ्यासोबत काय झाले हे सांगण्याची हिंमत करु शकले नाही.’ डेजी यांना दोन बहिणी आहेत हनी (फरहान आणि झोया अख्तरची आई) आणि मेनका (फराह आणि साजिद खानची आई) या दोघींनीही सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. दोन्ही बहिणींची डेजी नेहमीच जास्त काळजी करायच्या. कुत्सित हसत डेजी म्हणाल्या की, ‘आमच्या आईचे (पेरिन) आभार. कारण आम्ही लहान असताना आईने आमचं आयुष्य कधीही न संपणाऱ्या ब्लॅक कॉमेडीसारखं करुन ठेवलं होतं.’

एक दुसरा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की, ‘मी १५ वर्षांची असताना माझ्या आईने निर्माता मालिकचंद कोचर यांच्याकडे पॅडेड स्पॉज घालून आणि साडी नेसवून एकटीलाच पाठवले. मला मेरे हुजूर सिनेमात काम मिळावे अशी तिची इच्छा होती. ते माझ्यासोबत सोफ्यावर बसले आणि मला स्पर्श करायला सुरूवात केली. त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे याची जाणीव मला झाली. रागात मी घातलेले पॅडेड स्पंज काढून त्याच्या हातात ठेवले. हे पाहून त्यांना फार राग आलेला.’