देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच अभिनेत्री इशा गुप्ता हिने स्वातंत्र्यदिनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाए’ असं ट्विट इशाने केलं आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं.

‘मिस इंडिया’चा किताब जिंकलेल्या इशाला सामान्य ज्ञानसुद्धा नाही असा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. काहींनी तर तिला होळी आणि दिवाळीच्या उपरोधिक शुभेच्छा दिल्या. ट्रोल झाल्यानंतर इशाने ते ट्विट डिलीट करत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं. काही वेळानंतर तिने अकाऊंट पूर्ववत झाल्याचीही माहिती दिली आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत म्हणाली, ‘जिचे वडील हवाई दलात आहेत तिला तुम्ही स्वातंत्र्यदिन कधी आहे हे सांगत आहात. ट्रोलर्सना इतका का ऊत आला आहे?’

‘जन्नत २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली ईशा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी टॉपलेस आणि न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. ‘माझे फोटो अश्लिल आहेत, असे कोणीही म्हणणार नाही. मला तिरस्कारापेक्षा प्रेमच अधिक मिळालं. पण विसरून जाण्यापेक्षा तिरस्कार केव्हाही चांगला,’ असं म्हणत तिने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं होतं.