कलाकारांचं आयुष्य म्हणावं तितकं सोप्प नसतं. ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या कालाकारानांदेखील अनेक समस्यांना समोर जावं लागतं. सेटवर हे कलाकार अनेकदा १० – १२ तासांहूनही अधिक काळ काम करतात. मात्र या कामाचे पैसे त्यांना ९० दिवसांनंतर मिळतात. काम स्वीकारण्यापूर्वी करारावर तसं स्पष्ट केलेलं असतं. या पद्धतीवर अभिनेत्री हेमांगी कवीने सडकून टीका केली आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात तर झाली, मात्र त्या कामाचे पैसे कलाकारांना ९० दिवसांनंतर मिळणार. त्यामुळे खर्चाचं आणि आयुष्याचं गणित बसवायचं कसं असा सवाल हेमांगीने केला आहे.

फेसबुक पोस्टद्वारे तिने हा संताप व्यक्त केला आहे. ‘बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान मस्त! पण ते 90 days credit चं भूत अजून ही मानगुटीवर आहे. आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर. 365 पैकी 200 दिवस पैसे अकाऊंटला जमा होणार नाहीत. कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये. इन्शुअरन्स पॉलिसीचे हफ्ते कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय उरलेल्या 165 दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेज करायचे. आज …उद्या… या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही. कलाकार आणि टेक्निकल टीमकडून फुल सपोर्टची अपेक्षा. पण पेमेंटच्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही’, अशी तिने पोस्ट लिहिली आहे.

निदान काही महिने तरी ३० दिवसांचं क्रेडीट ठेवावं, अशी मागणी तिने या पोस्टच्या अखेरीस केली आहे.