बॉलिवूडमध्ये आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही या वादावर वक्तव्य करत बॉलिवूडमधील अनेकांना चांगलेच सुनावले. नुकताच तिने एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाची प्रशंसा केली. त्यानंतर सोशल मीडियावर कंगनाला राजकारणात प्रवेश करायचे असल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले. यावर आता कंगनाने ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे.

नुकताच कंगनाने दोन ट्विट केले आहेत. मला राजकारणात प्रवेश करायचा आहे म्हणून मी मोदींचे समर्थन करत आहे असे ज्यांना वाटते त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छिते की माझे आजोबा सलग १५ वर्षे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. माझे कुटुंब राजकारणात इतके लोकप्रिय आहे की गँगस्टर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवळपास प्रत्येक वर्षी मला तिकीटाची ऑफर मिळाली होती या आशयाचे ट्विट केले आहे.

त्यानंतर तिने मणिकर्णिका चित्रपटानंतर मला भाजपाने तिकिटाची ऑफर दिली होती. पण कलाकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी कधीही राजकारणाचा विचार केलेला नाही. त्यामुळे हे ट्रोलिंग थांबवायला हवं या आशयाचे दुसरे ट्विट तिने केले आहे.