04 December 2020

News Flash

तारांगण घरात : सुट्टीतली ऊर्जा आणि आनंद अनुभवते आहे

सध्या तरी मी पुन्हा एकदा चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट पाहाते आहे.

ईशा केसकर

शनाया म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिके तून लोकप्रिय झाल्यानंतर सातत्याने रसिकांचे प्रेम अनुभवलेल्या अभिनेत्री ईशा

केसकरसाठी टाळेबंदीतला हा काळ म्हणजे थोडीशी हवीहवीशी अशी सुट्टी आहे. या सुट्टीच्या काळात नेहमीच्या व्यग्र चित्रीकरणात ज्या ज्या गोष्टी करता येत नाही त्या सगळ्या करून  पाहायच्या. छोटय़ा-छोटय़ा गोष्टीतला भरभरून आनंद घेत पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागण्याची ऊर्जा यातून घ्यायचा मानस ईशाने व्यक्त केला.  सध्या तरी मी पुन्हा एकदा चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट पाहाते आहे. सुरक्षेचे सगळे नियम पाळून चित्रीकरणासाठी परवानगी देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशा अपेक्षेत आम्ही  आहोत, असे ईशा सांगते.

टाळेबंदीमुळे हातात जो काही वेळ आला आहे तो खरं म्हणजे माझ्यासाठी आवश्यक होता, असे ईशा सांगते. इतकी मोठी सुट्टी मला खरे तर ‘जय मल्हार’ संपून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सरू होणार होती त्यादरम्यान मिळाली होती. त्यानंतर दररोज ठाण्यात चित्रीकरण आणि गोरेगावपासूनचा तीन तासांचा प्रवास यातच दिवस कधी संपतो आहे हे कळत नव्हते. माझा समाजमाध्यमांवरचा वावरही जवळजवळ दुसऱ्यांच्या हातात असतो, कारण माझ्याकडे पुरेसा वेळ नसल्याने ते इतरांकडून मी करवून घेत होते. आता मात्र मी स्वत: चाहत्यांशी संवाद साधते आहे. इन्स्टाग्रामसारखे माझे अकाऊंट्स मीच सध्या हाताळते आहे. मित्रमैत्रिणी, परिचित यांच्याशी गप्पा होत आहेत, असे ईशाने सांगितले. ‘अनेकांना माझ्याशी बोलण्याची, माझ्याकडून काही जाणून घेण्याची इच्छा असते. एरव्ही मला कोणाशी इतका संवाद साधता येत नाही. आता मात्र मी प्रत्येकाशी आवर्जून संवाद साधते आहे. मध्ये मला जपानी गाणे गाण्याची विनंती चाहत्यांपैकी कोणी तरी के ली होती. मला नेहमीच इतर भाषा आणि संस्कृती जाणून घ्यायला आवडते. २००८ मध्ये मला शिष्यवृती मिळाली होती आणि एका सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत मी जपानला गेले होते. जपानमधून परतल्यानंतर मी वर्षभर जपानी भाषा शिक ले. त्या वेळी आम्ही एका स्पर्धेत भाग घेतला होता ज्यात आम्ही जपानी गाणे गायलो होतो. त्या स्पर्धेत आम्ही पाच मुली होतो आणि आम्ही ही स्पर्धा जिंकलो. त्या वेळी एक महागडे जपानी घडय़ाळ भेट म्हणून मिळाले होते. त्या सगळ्याची आठवण झाली आणि त्या स्पर्धेतील ते गाणे मी पुन्हा त्याच उत्साहात गायले,’ अशी आठवणही ईशाने सांगितली.  आणखी एक गोष्ट मी या टाळेबंदीच्या काळात आवर्जून करते आहे ते म्हणजे कोणालाही कोणती अडचण आली तर मला जितकी मदत करता येईल तेवढी मी करते. चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनाही मी हे सांगते. उरलेल्या वेळात अगदी कमीत कमी आणि हाताशी असलेल्या वस्तूंमधून मला काय करता येईल मग ते स्वयंपाकघरात पिझ्झा बनवणे असो किं वा फ्रे ंच फ्राईज.. या गोष्टी मी घरातच बनवते आहे. माझ्या दोन मांजरी आहेत. त्यांच्याबरोबर खेळण्यात, त्यांच्यावर माया करण्यातही माझा खूप छान वेळ जातो, असे ईशा सांगते. छोटय़ा-छोटय़ा गोष्टी करण्यातच आपल्याला आनंद मिळतो, हे ती आग्रहाने सांगते.

संकलन – रेश्मा राईकवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 3:02 am

Web Title: actress isha keskar sharing experience of lockdown zws 70
Next Stories
1 करोनाष्टक : हवीहवीशी गृहकैद
2 तारांगण घरात : पुन:प्रत्ययाचा आनंद
3 करोनाष्टक : सकारात्मकता महत्त्वाची
Just Now!
X