बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने आज रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात ईशाचा भाजपामध्ये प्रवेश झाला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूडमधील कलाकारांना पक्षात घेऊन प्रचारात स्टार कॅम्पेनेर म्हणून वापरण्यावर भाजपाचा भर असणार आहे. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश केल्याचा मला आनंद आहे. या परिवारासोबत जोडलं जाणं ही खरचं अभिमानाची गोष्ट असल्याचं ईशा यावेळी बोलताना म्हणाली.
षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भाजपाच्या नवं भारतीय शिववाहतूक संघटनेची घोषणा करण्यात आली. यावेळी शिववाहतूक संघटनेची सदिच्छा दूत आणि महिला कार्याध्यक्ष म्हणून ईशाची निवड करण्यात आली. सदिच्छा दूत आणि महिला कार्याध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत ईशा काम पाहणार आहे. ‘मला भाजपासोबत काम करण्याची संधी मिळणार असून, मी माझं काम चोखपणे करण्याचा प्रयत्न करेन. मला दिलेल्या जबाबदारीचे भान राखून कायम माझं कर्तव्य पार पडत राहिल, असा विश्वास यावेळी ईशाने व्यक्त केला. मात्र, हे काम करत असताना काही चुकलं तर मला माफ करा, असंही ईशा म्हणाली.’
या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उपस्थिती होती. ईशा कोप्पीकरने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहे. ईशा कोप्पीकरचा स्वत:चा असा वेगळा चाहतावर्ग आहे. याचा फायदा भाजपाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
ईशाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रब ने बना दी जोडी’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘राईट या राँग’,’मैंने प्यार क्यों किया’, ‘डरना जरुरी है’, ‘क्या कूल है हम’, ‘हम तुम’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ईशाने अभिनय केला आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मात’ या चित्रपटाद्वारे ईशाने मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू केला होता. ईशाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एफयू : फ्रेंडशीप’ अनलिमिटेड या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 5:16 pm