ट्विटरवर द्वेष पसरवल्याच्या आरोपावरुन अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेलचं ट्विटर अकाऊंट काही दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी रंगोली चंडेल ही नेहमी चर्चेत असायची. मात्र आपल्या बहिणीवर चारही बाजूंनी होत असलेली टीका पाहून कंगना रणौत रंगोलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कंगनाने सोशल मीडियावर भारतात राहूनही देशविरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रंगोलीने केलेल्या ट्विटचा चुकीचा अर्थ फराह खान आणि इतर काही लोकांनी काढला. प्रत्येक मुस्लीम डॉक्टरांवर हल्ला करतोय असं आमचं अजिबात म्हणणं नाही. रंगोलीने असं वक्तव्य केलं असल्यास आम्ही दोघींनी समोर येऊन माफी मागितली असती. या देशात तुम्ही पंतप्रधान, गृहमंत्री यांना अतिरेकी म्हणू शकता परंतू अतिरेक्यांना अतिरेकी म्हणता येत नाही. देशात राहून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी कंगनाने आपल्या व्हिडीओतून केली आहे.

रिमा कागती, कुब्रा सैत, सुझान खानची बहीण फराह अली खान यांसारख्या सेलिब्रिटींनी रंगोलीच्या ट्विटर अकाऊंटची तक्रार केली होती. योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.