कॉलेज आठवणींचा कोलाज :  खुशबू तावडे, अभिनेत्री

मी अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून केलं. मी डोंबिवलीकर आहे. घरापासून जवळ असलेल्या टिळक नगर महाविद्यालयात स्पोर्ट्स कोटातून मी प्रवेश घेतला. माझा या कॉलेजमध्ये चार मैत्रिणींचा घनिष्ठ चमू होता. अकरावी-बारावीला माझी वर्गात १००% हजेरी होती. उन्हाळा असो, धो धो पाऊस कोसळत असो, कडाक्याची थंडी असो, काहीही असो, मी कॉलेजला नियमित जायचे. या कॉलेजने मला एकीचे बळ काय असते, याची प्रचीती दिली. क्रिकेट हा माझा लहानपणापासूनचा आवडता खेळ. कॉलेजमध्ये असताना कॉलेजने माझ्यावर क्रिकेट टीम तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे मुलींजवळ क्रिकेटचा प्रचार- प्रसार करून एक टीम तयार केली.

त्यानंतर आम्ही अनेक टुर्नामेंट्समध्ये सहभागी झालो. ग्रुप तयार करायला किती जिद्द लागते, ते या दिवसांमध्ये मला अनुभवायला मिळालं. बारावीनंतर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. मुंबईत प्रवेश न मिळाल्याने मला गोवा किंवा अहमदाबाद या दोन शहरांपैकी एका शहराची निवड करायची होती. मी कोकणकन्या असूनसुद्धा अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतला. कारण वेगळं शहर, वेगळं कल्चर आणि वेगळे अनुभव मला खुणावत होते. पुढील शिक्षण मी आय.एच.एम. अहमदाबादमध्ये घेतलं. तीन वर्ष मी हॉस्टेलला एका वेगळ्या राज्यात राहिल्याने प्रत्येक दिवस मला एक अनुभव देत होता. पांढराशुभ्र, अतिशय स्वच्छ आणि भव्य कॉलेज पाहून मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी तर भारावले होते. माझे आईबाबा मला सोडायला आले होते. कॉलेज इतकं मोठं होतं की, एक मराठी मुलगी तिच्या आईवडिलांपासून हरवली होती. नंतर जी माझी पुढे रूममेट झाली. आमच्या कॉलेजचे तीन-चार युनिफॉर्म होते. शेफ कोट, सव्‍‌र्हिस कोट वगैरे वगैरे. युनिफॉर्म घालून कॅम्पसबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आमच्या कॉलेजच्या बाहेर गुजराती खवय्येगिरीची चंगळ होती. डाळ ढोकळी माझी ऑल टाइम फेव्हरेट. मला नेहमी वाटायचं की, या गाडीवर कॉलेज युनिफॉर्म म्हणजेच शेफ कोट घालून एकदा तरी फोटो  काढावा. यासाठी मी नेहमी मित्रांजवळ भुणभुण करायचे आणि माझी ही इच्छा माझ्या मित्रांनी पूर्ण केली. वॉचमनचा डोळा चुकवून मला माझ्या मित्रांनी कॅम्पसबाहेर काढलं, फोटो काढून दिला आणि सुखरूप हॉस्टेलर्प्यत आणून सोडलं.

इतर कलाकारांकडे मी जेव्हा बघते तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या आठवणी आणि माझ्या आठवणी यात खूप फरक आहे. माझं कल्चरच वेगळं होतं. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज म्हटल्यावर खाण्यापिण्याची चंगळ तर असणारच. आमचं किचन हाच आमचा कट्टा असायचा. इथेच आम्ही धुडगूस घालायचो. पहिल्या वर्षी आमचे किचनचे तास दर मंगळवारी असायचे आणि तुम्ही जे काही बनवता ते तुम्हाला टेस्ट करावं लागतं. डोंबिवलीत असताना लहानपणापासून मी मंगळवारचे उपवास करायची आणि त्यात मला कॉलेजमध्ये दर मंगळवारी नॉनव्हेज खायला लागायचं जे मी डोळे बंद करून खायचे; पण एकदा मी शांतपणे स्वत:च्या मनाची समजूत काढली, की हे आपलं शिक्षण आहे. त्यामुळे त्याला काही इलाज नाही.

मला खाणं आणि एखाद्या पदार्थाची चव घेणं यातला फरकच पहिले कळत नव्हता. किचनच्या तासाला जे बनवता ते टेस्ट करा, असं सांगितल्यावर मी ती डिश बकाबका खायची आणि दर लेक्चरला ताटात काही तरी वेगळा आंतरराष्ट्रीय पदार्थ असायचा जो घरी इतका टेस्टी होणं शक्यच नाही. माझ्या या वृत्तीचा मला नंतर चांगलाच फटका बसला. माझ्या आतडय़ांना सूज आली आणि मी एक महिना घरी डोंबिवलीला निघून आले. तेव्हापासून कानाला खडा, खाणं आणि चव घेणं यात फरक आहे. कॉलेजला असताना मी एकच कल्चर अनुभवलं नाही. मल्टिकल्चर अनुभवलं. कारण आमच्या कॉलेजला भारत देशातल्या कानाकोपऱ्यातल्या राज्यातून आलेली मुलं होती. प्रत्येकाचं कल्चर मी जवळून अनुभवलं. माझ्या काही पंजाबी मैत्रिणी होत्या. त्यांना मी आपले पारंपरिक मराठी पदार्थ शिकवले. त्यांनी मला काही पदार्थ शिकवले. आय.एच.एम. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निग पॉइंट होता.

शब्दांकन : मितेश जोशी